ट्रम्प यांचा मध्य-पूर्वेसाठी प्रस्ताव ही शांततेसाठी 'शेवटची संधी'; इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे मत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्वेसाठीचा प्रस्ताव हा या प्रदेशातील शांततेसाठी ‘शेवटची संधी’ आहे, असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह एल-सिसी यांनी सोमवारी जागतिक नेत्यांच्या परिषदेतील आपल्या भाषणात सांगितले.
ट्रम्प यांचा मध्य-पूर्वेसाठी प्रस्ताव ही शांततेसाठी 'शेवटची संधी'; इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे मत
ट्रम्प यांचा मध्य-पूर्वेसाठी प्रस्ताव ही शांततेसाठी 'शेवटची संधी'; इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांचे मत
Published on

शर्म एल-शेख : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यपूर्वेसाठीचा प्रस्ताव हा या प्रदेशातील शांततेसाठी ‘शेवटची संधी’ आहे, असे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह एल-सिसी यांनी सोमवारी जागतिक नेत्यांच्या परिषदेतील आपल्या भाषणात सांगितले.

द्विराष्ट्रीय तोडग्याची मागणी करतानाच त्यांनी सांगितले की, पॅलेस्टिनी लोकांना स्वतंत्र राष्ट्राचा हक्क आहे. गाझातील युद्ध थांबविण्यासाठी झालेल्या युद्धविरामाला पाठिंबा देणे आणि उद्ध्वस्त पॅलेस्टिनी प्रदेशाचे पुनर्निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आराखडा तयार करणे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘शांतता आराखड्याला’ जागतिक समर्थन मिळवून देण्यासाठी ही परिषद आयोजित केल्याचे दिसत होते. सह-अध्यक्ष असलेल्या इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांनी ट्रम्प यांना उद्देशून म्हटले, ‘या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याची क्षमता फक्त तुमच्याकडेच आहे.’

इस्रायलचा पॅलेस्टिनी स्वातंत्र्याला विरोध कायम

ट्रम्प यांच्या योजनेनुसार पॅलेस्टिनी राज्य स्थापन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, पण त्यापूर्वी गाझामध्ये संक्रमण काळ व पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या सुधारणा प्रक्रियेचा टप्पा येईल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मात्र पॅलेस्टिनी स्वातंत्र्याला विरोध दर्शविला आहे. ट्रम्प यांनी परिषदेतील भाषणात दोन राष्ट्रांच्या तोडग्याचा उल्लेख केला नाही.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात मध्यपूर्वेत “सामंजस्याच्या नव्या युगाची” सुरुवात करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, ‘आपल्या पिढीसमोर भूतकाळातील वैर आणि संघर्ष मागे सोडण्याची एकमेव संधी आहे.’

अमेरिका, अरब देश आणि तुर्कस्तान यांच्या दबावानंतर इस्रायल आणि हमास यांनी कतारमार्फत मध्यस्थी झालेल्या युद्धविराम कराराच्या पहिल्या टप्प्यास मान्यता दिली असून हा करार शुक्रवारी लागू झाला.

डोनाल्ड ट्रम्प, इजिप्तचे एल-सिसी, कतारचे अमीर आणि तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष यांनी यासंबंधीच्या एका दस्तावेजावर स्वाक्षरी केली. ट्रम्प म्हणाले, ‘या दस्तावेजात अनेक नियम, प्रक्रिया आणि मुद्द्यांचे सविस्तर तपशील आहेत.’ मात्र, तो दस्तावेज माध्यमांसमोर जाहीर करण्यात आला नाही.

जगातील २० हून अधिक नेत्यांनी या परिषदेला हजेरी लावली. त्यात जॉर्डनचे राजा अब्दुल्ला, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि ब्रिटनचे पंतप्रधान यांचा समावेश होता.

logo
marathi.freepressjournal.in