डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा मध्यस्थी; आता इस्रायल-गाझा युद्ध थांबवणार; मांडला २० कलमी ‘प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’, मोदींनी केले स्वागत

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी २० कलमी शांतता करार कार्यक्रम ठरविला आहे. ट्रम्प यांच्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ट्रम्प यांची ही योजना संपूर्ण पश्चिम आशियात दीर्घकालीन शांततेचा मार्ग दाखवणारी आहे, असे मोदी म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा मध्यस्थी; आता इस्रायल-गाझा युद्ध थांबवणार; मांडला २० कलमी ‘प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन’, मोदींनी केले स्वागत
Published on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इस्रायल आणि हमास यांच्यात गाझा पट्टीत सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी २० कलमी शांतता करार कार्यक्रम ठरविला आहे. ट्रम्प यांच्या या योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. ट्रम्प यांची ही योजना संपूर्ण पश्चिम आशियात दीर्घकालीन शांततेचा मार्ग दाखवणारी आहे, असे मोदी म्हणाले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर हा २० कलमी युद्धबंदी प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा भारत व पाकिस्तान संघर्षात मध्यस्थी केल्याचे दावे करत आहेत. अर्थात, भारताकडून हे दावे फेटाळण्यात आले असले, तरी त्याबाबत ट्रम्प प्रत्येकवेळी तितक्याच जोरदारपणे आपली भूमिका मांडत आहेत. आता ट्रम्प यांनी इस्रायल व हमास यांच्यात गाझा पट्टीत चालू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी २० कलमी कार्यक्रम ठरवला आहे.

त्यावर युद्धबंदी अवलंबून

या प्रस्तावातील तरतुदी गाझा प्रशासनाने मान्य करण्यावर युद्धबंदी अवलंबून असून त्यात प्रामुख्याने गाझामधील हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांना ७२ तासांमध्ये जिवंत अथवा मृत इस्रायलच्या हवाली करण्याचा मुद्दा समाविष्ट केला आहे. तसेच, आगामी काळात हमासचा गाझाच्या प्रशासनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल, असेही नमूद करण्यात आले आहे.

२० कलमी प्रस्तावात काय

यापुढे गाझा पूर्णपणे कट्टरपंथी संघटनांपासून मुक्त असेल, शेजारी देशांना गाझापासून कोणताही धोका नसेल, या संघर्षात सर्वाधिक भोगावे लागलेल्या गाझातील नागरिकांसाठी गाझा नव्याने उभारले जाईल. जर या प्रस्तावाला दोन्ही बाजूंची मान्यता असेल, तर हे युद्ध ताबडतोब थांबेल. इस्रायलचे सैन्य त्यांनी सहमती दर्शवलेल्या सीमेपर्यंत मागे येईल आणि ओलिसांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू होईल. इस्रायलने हा प्रस्ताव जाहीरपणे मान्य केल्यानंतर ७२ तासांत दहशतवादी संघटनांकडून सर्व ओलिसांची मुक्तता केली जाईल. सर्व ओलिसांची सुटका झाल्यानंतर इस्रायल आपल्या ताब्यातील जन्मठेपेची शिक्षा झालेले २५० युद्धकैदी व ७ ऑक्टोबर २०२३ नंतर ताब्यात घेतलेल्या १७०० गाझा नागरिकांची सुटका करेल. इस्रायलच्या प्रत्येकी एका ओलीस सुटकेमागे इस्रायल १५ गाझा नागरिकांची सुटका करेल, असे प्रस्तावात आहे.

नकाशा तयार

व्हाईट व्हाऊसने ट्रम्प यांच्या योजनेचा नकाशा तयार केला असून प्रसिद्ध केलेल्या नकाशावर निळी, पिवळी आणि लाल अशा तीन रेषा आहेत आणि त्यानंतर बफर झोन आहे. या रेषेपर्यंतचा भाग अजून इस्रायली लष्कराच्या नियंत्रणाखाली आहे, ही रेषा युनूस खानजवळ आहे, असा निळ्या रेषेचा अर्थ आहे. त्यानंतर राफाजवळून पिवळी रेषा जाते. ही रेषा लष्कर मागे घेण्याचा पहिला टप्पा असेल. त्यालाच पहिली माघार रेषा म्हटले गेले आहे. या पिवळ्या रेषेचा अर्थ ओलिसांना सोडण्याबरोबरच इस्रायली लष्कर मागे पिवळ्या रेषेपर्यंत येईल.

logo
marathi.freepressjournal.in