

इटलीतील बर्गामो प्रांतातील कोव्हो येथे वैशाखी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक घटना घडली आहे. गुरुद्वाराबाहेर अज्ञात हल्लेखोराने गोळीबार करून दोन भारतीयांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुद्वाराबाहेर गोळीबार
स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्रीच्या काही मिनिटांपूर्वी घडली. कोव्हो शहरातील औद्योगिक भागात असलेल्या 'गुरुद्वारा माता साहिब कौर जी' समोर हा गोळीबार झाला. वैशाखीच्या निमित्ताने येथे धार्मिक कार्यक्रम सुरू होता.
मृतांची ओळख
या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींची ओळख पटली असून, रागिंदर सिंग (वय ४८) कोव्हो येथील रहिवासी असून गुरमीत सिंग (वय ४८) अग्नाडेल्लो येथील रहिवासी होते.
हल्लेखोर फरार
माहितीनुसार, हल्लेखोर अचानक दोघांजवळ आला आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर तो कारमधून घटनास्थळावरून फरार झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हल्लेखोर भारतीय वंशाचा असल्याचा संशय आहे आणि तो गुरुद्वारात ये-जा करत होता.
नियोजित कटाचा संशय
घटनास्थळी सुमारे १० गोळ्यांचे कवच (शेल केसिंग) आढळले आहेत. प्राथमिक तपासात हा प्रकार अचानक भांडणातून झाला नसून, पूर्वनियोजित हल्ला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तिसरा व्यक्तीही जखमी
या गोळीबारात तिसऱ्या व्यक्तीलाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळी त्याला चाटून गेल्याचे सांगितले जाते.
वैशाखी कार्यक्रमावर परिणाम
शनिवारी याच परिसरात वैशाखीचा अधिकृत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे इटलीतील भारतीय समुदायात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.