''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक

काही भारतीय खेळाडू आणि पर्यटकही नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पोखरा येथे झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये भारतीय महिला व्हॉलीबॉल लीगची सादरकर्ती उपासना गिल अडकली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात तिने राहत असलेले सरोवर हॉटेल आंदोलकांनी पेटवून दिल्याचे सांगितले आहे.
''मला फक्त घरी यायचंय''; नेपाळमध्ये अडकली भारतीय महिला खेळाडू, आंदोलकांनी हॉटेलच पेटवले, दूतावासाकडे मदतीची हाक
Published on

नेपाळमध्ये सोशल मीडियावरील बंदी उठवूनही वातावरण अजूनही अशांत आहे. सरकारविरोधी निदर्शनांना हिंसक वळण लागल्याने राजकीय नेत्यांनी राजीनामे दिले असून काही नेते देश सोडण्याच्या तयारीत आहेत. या गोंधळात काही भारतीय खेळाडू आणि पर्यटकही नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. पोखरा येथे झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये भारतीय महिला व्हॉलीबॉल लीगची सादरकर्ती उपासना गिल अडकली. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून, त्यात तिने राहत असलेले सरोवर हॉटेल आंदोलकांनी पेटवून दिल्याचे सांगितले आहे. आंदोलकांनी पर्यटकांचाही विचार न करता हल्ले केल्याचा धक्कादायक अनुभव तिने व्यक्त केला आहे.

आंदोलकांनी जाळले हॉटेल

उपासना गिलने भयावह परिस्थिती कथन करणारा व्हिडिओ पत्रकार प्रफुल गर्ग यांना पाठवला. त्यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये उपासनाने सांगितले की, ''भारतीय दूतावास आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज आमची मदत करा. मी व्हॉलीबॉल लीग होस्ट करण्यासाठी नेपाळला गेली होती आणि पोखरातील सरोवर हॉटेलमध्ये राहत होती. मात्र, अचानक आंदोलकांनी हॉटेलवर हल्ला केला. मी स्पामध्ये असताना अचानक लोकांचे ओरडणे ऐकू आले. काही लोक काठ्या घेऊन आले आणि मागे धावू लागले. कसाबसा जीव वाचवला. नंतर आंदोलकांनी हॉटेलच जाळून टाकले," असे तिने सांगितले.

आंदोलकांना पर्यटकांचीही काळजी नाही

तिने तेथील विदारक परिस्थितीचे वर्णन करताना सांगितले, की ''इथे हालत खूप खराब आहे. रस्त्यारस्त्यावर जाळपोळ होत आहे. हे लोकं पर्यटकांचाही विचार करत नाहीयेत. कोणी इथे कामासाठी आले आहेत; पण आंदोलकांना काहीही फरक पडत नाहीये. कृपया आम्हाला मदत करा. आम्ही खूप लोक आहोत. आम्हाला माहीत नाही आम्ही इथे किती वेळ आहोत. आम्हाला फक्त इथून सुरक्षित बाहेर पडायचे आहे. मला फक्त घरी यायचे आहे.''

आम्ही सर्वस्व गमावले...

उपासनाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये हॉटेल जळताना दिसत आहे. गिलसोबत केवळ भारतीयच नाही तर विदेशातील देखील पर्यटक आणि खेळाडू आहेत. सर्वजण आहे त्या अवस्थेत बाहेर पडलेले स्पष्ट दिसत आहे. गिलने तिच्या स्टोरीत लिहिले, "आम्ही सर्वस्व गमावले आहे. आम्हाला फक्त सुरक्षितपणे घरी जायचे आहे. कृपया मदत करा."

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी केला असून आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकही सक्रिय केले आहेत.

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली

दरम्यान, नेपाळमधील परिस्थिती अधिकच बिघडली आहे. सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर सरकारविरोधी चळवळीत झाले आहे. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून ५०० हून अधिक जखमी झाले आहेत. वाढत्या संकटामुळे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी ९ सप्टेंबर रोजी राजीनामा दिला असून काठमांडू, पोखरा यांसह प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा कारवाईची जबाबदारी नेपाळ लष्कराकडे सोपवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in