मध्यपूर्वेतील संघर्ष चिघळला; अमेरिकेची इस्रायल-इराण संघर्षात उडी, इराणच्या ३ अणुकेंद्रावर अमेरिकेचा मोठा हल्ला

मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी वाढला असून शनिवारी रात्री अमेरिकेने इराणवर जोरदार हवाई हल्ला करत इराणच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या आण्विक स्थळांवर लक्ष्य साधले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या कारवाईची पुष्टी केली आहे. या हल्ल्यानंतर आता अमेरिका थेट इस्रायल-इराण संघर्षात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.
मध्यपूर्वेतील संघर्ष चिघळला; अमेरिकेची इस्रायल-इराण संघर्षात उडी, इराणच्या ३ अणुकेंद्रावर अमेरिकेचा मोठा हल्ला
Published on

मध्यपूर्वेतील संघर्ष आणखी वाढला असून शनिवारी रात्री अमेरिकेने इराणवर जोरदार हवाई हल्ला करत इराणच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या आण्विक स्थळांवर लक्ष्य साधले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या कारवाईची पुष्टी केली आहे. या हल्ल्यानंतर आता अमेरिका थेट इस्रायल-इराण संघर्षात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेच्या या हल्ल्याचा थेट उद्देश इराणच्या अणुशक्ती केंद्रांना निष्प्रभ करणे हाच होता. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या हवाई दलाने फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या तीन ठिकाणांवर ‘बंकर बस्टर’ बॉम्बचा वापर केला. ही ठिकाणं इराणच्या अणुकार्यक्रमातील सर्वात संवेदनशील आणि संरक्षित केंद्रांपैकी मानली जातात.

तीन अणुकेंद्रांवर अमेरिकेचा हल्ला -

फोर्डो हे डोंगराखाली लपवलेले अणुकेंद्र असून अत्यंत सुरक्षित मानले जाते. नतान्झ हे देशातील सर्वात मोठं युरेनियम समृद्धीकरण संयंत्र आहे, तर इस्फहान हे अणुऊर्जा केंद्र असून या परिसरात बॉम्ब-ग्रेड युरेनियम असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, “फोर्डोवर पूर्ण क्षमतेचा पेलोड टाकण्यात आला आहे. आमची विमाने सुरक्षितपणे परतली आहेत.” तर ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईबद्दल आपल्या लष्कराचे अभिनंदन करत ''आता शांततेची वेळ आली आहे'' असे म्हंटले.

या हल्ल्यात अमेरिकेने GBU-57 Massive Ordnance Penetrator बंकर बस्टर’ बॉम्ब वापरले. हे 13.6 टन वजनाचे बॉम्ब खास जमिनीखालील, पर्वतांमधील किंवा मजबूत संरक्षित बंकर उध्वस्त करण्यासाठीच डिझाइन केलेले असतात. हे शस्त्र फक्त अमेरिकेकडेच असून, अशा प्रकारची लक्ष्यं नष्ट करण्याची क्षमता अमेरिकेपुरतीच मर्यादित आहे.

युद्ध आणखी भडकण्याची शक्यता -

या कारवाईमुळे युद्ध अधिक गंभीर वळणावर आले आहे. काही आठवड्यांपूर्वीच, इस्रायलने इराणवर अचानक हल्ला केला होता, ज्यातून संघर्षाला सुरुवात झाली. त्यानंतर इराणनेही उत्तर देत इस्रायलच्या हैफा, बेरशेवा आणि गोलान हाइट्स शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. आता अमेरिकेच्या सहभागामुळे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

इराणमध्ये मोठी जीवितहानी -

इराणमध्ये झालेल्या या हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरी हानी झाली आहे. इराणच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये ५४ महिला आणि मुले आहेत. सुमारे ३,००० जण जखमी झाले आहेत. देशातील अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद असून, नागरिकांचा जगाशी संपर्क तुटलेला आहे.

खामेनी यांची सुरक्षा अधिक बिघडली -

या हल्ल्यांमुळे इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांची सुरक्षा अधिक बिघडली असून ते सतत आपले ठिकाण बदलत आहेत. इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने बरीचशी क्षेपणास्त्रे आकाशातच निष्क्रिय केली आहेत. मात्र, इतक्या वेगाने इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा वापर होतो आहे की त्यांच्या साठ्यात आता घट झाली आहे.

अमेरिकेने याआधी इराणविरोधी कारवाईत थेट सहभाग न घेतल्याचेच सूचित केले होते. मात्र, आता ट्रम्प यांच्या आदेशाने युद्धाच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलण्यात आले आहे. जागतिक तज्ज्ञांच्या मते, ही कारवाई इराणच्या आण्विक क्षमतेवर गंभीर आघात करणारी आहे.

या घटनेनंतर संपूर्ण जागतिक समुदायाची नजर मध्यपूर्वेतील घडामोडींवर केंद्रित झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपीय संघ आणि इतर देशांनी युद्ध थांबवण्यासाठी शांततेची आवाहने केली आहेत. मात्र, अमेरिकेच्या या निर्णायक कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in