

नवी दिल्ली : अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून नियुक्त झालेले सर्जिओ गोर हे राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. गोर हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांपैकी एक आहेत.
गोर यांनी नोव्हेंबरमध्ये भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून शपथ घेतली होती. शुक्रवारी रात्री राष्ट्रीय राजधानीत आगमन झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर, 'भारतामध्ये पुन्हा येऊन खूप आनंद झाला! आपल्या दोन्ही देशांसाठी पुढे विलक्षण संधी आहेत,' असे म्हटले. गोर यांचे भारतात आगमन अशा वेळी झाले आहे की, दोन्ही देशांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे.
ऑगस्टमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी गोर यांची भारतातील पुढील अमेरिकन राजदूत म्हणून नियुक्ती केली. तेव्हा ते व्हाइट हाऊसमध्ये कर्मचारी संचालक म्हणून कार्यरत होते. गोर यांनी आपल्या नव्या भूमिकेला 'आयुष्यभराचा सन्मान' असे संबोधले असून, अमेरिका-भारत संबंध 'अधिक दृढ' करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.