
अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी भारत, चीन आणि ब्राझिलसारख्या देशांना थेट इशारा दिला आहे. "जर तुम्ही रशियन तेल खरेदी करणं थांबवलं नाही, तर आम्ही तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू," असे ते 'फॉक्स न्यूज'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार, रशियाकडून तेल खरेदी करून हे देश अप्रत्यक्षपणे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनविरुद्धच्या युद्धात आर्थिक बळ पुरवत आहेत. त्यामुळे अशा देशांवर १०० टक्के शुल्क लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
१०० टक्के शुल्क लावणार
ग्रॅहम यांनी सांगितले की, रशिया जितकं तेल निर्यात करतो, त्यापैकी तब्बल ८० टक्के तेल भारत, चीन आणि ब्राझिल या तिन्ही देशांकडे जातं. त्यामुळे या देशांची भूमिका रशियाच्या युद्धखोरीला चालना देणारी ठरते. ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या अशा देशांवर १०० टक्के शुल्क लावण्याचा विचार करत आहेत, जेणेकरून रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मिळणारे आर्थिक पाठबळ थांबवता येईल, असे ग्रॅहम म्हणाले. "पुतीन यांना मदत केल्यामुळे शिक्षा म्हणून राष्ट्रपती ट्रम्प त्या सर्व देशांवर १०० टक्के शुल्क लावणार आहेत", असे ते म्हणाले. जगभरातील देश युक्रेनमधील युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत असताना, हे देश स्वस्त तेल खरेदी करून रशियाला फायद्यात आणत आहेत. हे पैसे रक्ताने माखलेले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
लिंडसे ग्रॅहम म्हणाले, "भारत, चीन आणि ब्राझिल या देशांनी जर रशियन तेल खरेदी करणं चालू ठेवलं, तर ट्रम्प प्रशासन त्यांच्या अर्थव्यवस्थेला लक्ष बनवेल. आम्ही त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करू. ट्रम्प निर्णायक पावलं उचलण्यासाठी सज्ज आहेत."
कोणाबरोबर राहायचं ते तुम्ही ठरवा -
ग्रॅहम यांनी भारत, चीन आणि ब्राझील यांना असा इशारा दिला की, आता तुम्हाला ठरवावं लागेल, अमेरिकन अर्थव्यवस्थेशी जोडून राहायचं की रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना पाठिंबा द्यायचा.
पुतिन यांना ५० दिवसांचा अल्टिमेटम
पुढे त्यांनी सांगितले, की ''ट्रम्प प्रशासनाने पुतिन यांना युक्रेन विरुद्ध ५० दिवसांत शांतता करारावर सहमती दर्शवण्याचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा रशियावर आणि त्यांच्या व्यापार भागीदारांवर कठोर निर्बंध लादले जातील.''
डोनाल्ड ट्रम्प 'राजकारणातील स्कॉटी शेफलर'
मुलाखतीच्या अखेरीस त्यांनी ट्रम्प यांचं वर्णन करताना म्हटलं, "डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन राजकारणातील स्कॉटी शेफलर (प्रसिद्ध गोल्फपटू) आहेत. त्यांनी आधीही सर्वांना हरवलं आहे आणि आता ते पुन्हा जागतिक स्तरावर कठोर भूमिका घेणार आहेत.''