Venezuela Earthquake : भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर

व्हेनेझुएलामध्ये अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे भूकंप झाले. या दुर्घटनेत ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी झाले असून देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर
भीषण भूकंपाने व्हेनेझुएला हादरला! ३२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी; इमर्जन्सी जाहीर Photo : X
Published on

दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये बुधवारी (दि. २४) संध्याकाळी अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने दोन शक्तिशाली भूकंप झाले. आयएएनएसच्या वृत्तानुसार, या भूकंपांमध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. अनेक इमारती कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

एका मिनिटात दोन भूकंप

व्हेनेझुएलातील स्थानिक वेळेनुसार, बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हे दोन भूकंप झाले. अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (यूएसजीएस) माहितीनुसार, पहिला ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर अवघ्या एका मिनिटात ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला. दोन्ही भूकंपांचे केंद्र मोरोन शहराजवळ होते. पहिला भूकंप २२ किलोमीटर तर दुसरा १० किलोमीटर खोलीवर झाला. हे भूकंप गेल्या शंभर वर्षांतील व्हेनेझुएलामधील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी असल्याचे मानले जात आहे.

देशात आणीबाणी जाहीर

भूकंपानंतर व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. भूकंपामुळे अनेक राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून काराकासजवळील ला गुएरा हा सर्वाधिक प्रभावित भाग ठरला आहे. या भागाला ‘आपत्तीग्रस्त क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहे.

इमारती कोसळल्या, सेवा विस्कळीत

भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या असून रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. काराकासजवळील सिमॉन बोलिव्हार आंतरराष्ट्रीय विमानतळाचेही नुकसान झाले असून विमानसेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. तसेच मेट्रो आणि नैसर्गिक गॅस सेवाही थांबवण्यात आल्या आहेत. काही भागांमध्ये वीज आणि मोबाईल नेटवर्क खंडित झाले आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर

भूकंपानंतर अग्निशमन दल, पोलीस, लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन, स्निफर डॉग्स आणि जड यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. फाल्कन राज्यात काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती समोर आली होती.

अनेक देशांची मदतीची घोषणा

या आपत्तीनंतर अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, चिली, इक्वेडोर, एल साल्वाडोर, अर्जेंटिना आणि कतारसह अनेक देशांनी मदतीची घोषणा केली आहे. काही देशांकडून बचाव पथके आणि वैद्यकीय मदतही पाठवण्यात येत आहे.

ब्राझील आणि कोलंबियातही धक्के

भूकंपाचे धक्के ब्राझील आणि कोलंबियाच्या काही भागांपर्यंत जाणवले. भूकंपानंतर अमेरिकेच्या पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरकडून त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काही वेळातच हा इशारा मागे घेण्यात आला. तज्ज्ञांनी आफ्टरशॉक्सचा धोका कायम असल्याचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in