

हनोई : व्हिएतनाममध्ये शनिवारी एक मोठी दुर्घटना घडली असून पर्यटकांनी भरलेली एक वेगवान बोट (स्पीडबोट) समुद्रात उलटल्याने किमान १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. या बोटीत एकूण ३६ पर्यटक होते. भारतीय पर्यटकांपैकी बहुतांशी जण हे तेलंगणा, आंध्र, तमिळनाडू अशा दक्षिणी राज्यातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्पीडबोटमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलाचे ४ सदस्य असे एकूण ३६ जण स्वार होते. फु क्वोक किनारपट्टीजवळील 'आन थोई' द्वीपसमूहाचा भाग असलेल्या 'हॉन मे रुत न्गोई' बेटापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असताना ही बोट समुद्रात उलटली, अशी माहिती व्हिएतनाममधील 'व्हीएन एक्स्प्रेस इंटरनॅशनल' या वृत्तसंस्थेने स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने दिली आहे.
२१ जणांना वाचविले
व्हिएतनाममधील आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र 'व्हिएतनाम न्यूज'ने दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतून २१ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे, तर १५ जणांचा मृत्यू झाला असून हे सर्व पर्यटक भारतीय आहेत. वाचवण्यात आलेल्यांपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
समुद्रातील वेगवान वारे आणि प्रचंड उसळणाऱ्या लाटांमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज स्थानिक माध्यमांनी वर्तवला आहे. फु क्वोक हे व्हिएतनाममधील सर्वात मोठे बेट असून ते पांढऱ्या वाळूचे किनारे, प्रवाळ खडक (कोरल रीफ) आणि विविध बेटांच्या सफारीसाठी जगभरातील पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.
हेल्पलाईन जारी
या भीषण दुर्घटनेची दखल घेत हनोई येथील भारतीय दूतावासाने एक्स वरून माहिती दिली आहे. पीडित आणि त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ माहिती व आवश्यक ती मदत पुरवण्यासाठी 'हो ची मिन्ह' शहरात असणारे भारताचे महावाणिज्य दूतावास आणि हनोई येथील मुख्य दूतावासात विशेष नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय दूतावासाने अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला असून मृतदेहांची ओळख पटवणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला आहे. मात्र, मृतांच्या अधिकृत तपशिलाबाबत दूतावासाकडून अधिकृत माहिती येणे अजून बाकी आहे.
बचावकार्य युद्धपातळीवर
अपघाताची माहिती मिळताच परिसरात उपस्थित असलेल्या इतर पर्यटक बोटींनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर व्हिएतनामचे सीमारक्षक, नौदल, तटरक्षक दल आणि इतर बचाव यंत्रणांनी घटनास्थळी पोहोचून युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू केली.
संपर्क क्रमांक
मदत आणि चौकशीसाठी संपर्क क्रमांकः हो ची मिन्ह सिटी नियंत्रण कक्षः +८४ ३६ २८१ ७९३०, +८४ ९१ ५५२ ३७ १४ आणि +८४ ३३ ४५२ ०४१४ हनोई नियंत्रण कक्षः + ८४ ९१ ३०८ ९१६५ घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि मदतीसाठी नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात, असे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे.