व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

व्हिएतनामच्या फु क्वोक बेटाजवळ भारतीय पर्यटकांची बोट उलटली. दुर्घटनेत १५ भारतीयांचा मृत्यू, २१ जणांची सुटका झाली असून भारतीय दूतावासाने मदतीसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे.
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू
व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरूX / @holinh87
Published on

व्हिएतनाममधील फु क्वोक (Phu Quoc) बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक स्पीडबोट शनिवारी (दि. ११) उलटल्याची दुर्दैवी घटना घडली. व्हिएतनामच्या राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला असून २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावलेल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय दूतावासाने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.

फु क्वोक बेटाजवळ स्पीडबोट उलटली

भारतीय दूतावासाने 'एक्स'वरील पोस्टद्वारे या दुर्घटनेची माहिती दिली. दूतावासाच्या माहितीनुसार, भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट फु क्वोक बेटाजवळ उलटली असून, घटनेचा नेमका तपशील स्थानिक प्रशासनाकडून पडताळला जात आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

१५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू; २१ जणांची सुटका

व्हिएतनामच्या राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पीडबोटमध्ये ३२ भारतीय पर्यटक आणि चालक दलातील ४ सदस्य असे एकूण ३६ जण होते. या दुर्घटनेत १५ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला, तर २१ जणांची सुटका करण्यात आली आहे. बचावलेल्या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, ही बोट होन मे रुट (Hon May Rut) बेटावरून ॲन थोई (An Thoi) बंदराकडे जात असताना किनाऱ्यापासून सुमारे ४०० मीटर अंतरावर उलटली. त्या वेळी समुद्रात खवळलेले वातावरण असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेचे काही व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये समुद्रात उलटलेली बोट आणि जवळील इतर बोटींकडून सुरू असलेले बचावकार्य दिसत आहे.

मदतीसाठी भारतीय दूतावासाने सुरू केले हेल्पलाइन

घटनेनंतर भारतीय दूतावासाने बाधित पर्यटकांच्या नातेवाईकांसाठी हो ची मिन्ह सिटी आणि हनोई येथे नियंत्रण कक्ष (Control Room) सुरू केले आहेत.

हो ची मिन्ह सिटी (Consulate General of India):

  • +84 36 281 7930

  • +84 91 552 3714

  • +84 33 452 0414

हनोई (Embassy of India):

  • +84 91 308 9165

भारतीय दूतावासाने सांगितले की, या क्रमांकांवर प्रभावित कुटुंबीयांना आवश्यक माहिती आणि मदत उपलब्ध करून दिली जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in