

'अल्फा' चित्रपटामुळे सध्या अभिनेत्री आलिया भट्ट चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटातील तिच्या दमदार भूमिकेसोबतच प्रमोशनल इव्हेंटमधील तिचे स्टायलिश लुक्स आणि नैसर्गिक सौंदर्यही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. ३३ वर्षांची आणि एका मुलीची आई असलेली आलिया आजही तितकीच फ्रेश, फिट आणि क्यूट दिसते. तिच्या तजेलदार त्वचेमागचं रहस्य काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आलियाने स्वतः एका घरगुती स्नॅकच्या माध्यमातून दिलं आहे.
फक्त चार साध्या पदार्थांपासून तयार होणारा हा हेल्दी स्नॅक त्वचेला नैसर्गिक ग्लो देण्यास मदत करू शकतो.
महागड्या ट्रीटमेंटपेक्षा घरगुती उपायांवर भर
अनेकांना वाटतं की सेलिब्रिटी कायम महागड्या स्किन ट्रीटमेंट्स घेत असतील. मात्र, आलियाचं मत वेगळं आहे. ती संतुलित आहार, नियमित जीवनशैली आणि घरच्या घरी तयार होणाऱ्या पौष्टिक पदार्थांवर अधिक विश्वास ठेवते.
आलियाचा आवडता स्किन स्नॅक कोणता?
आलियाने सांगितल्याप्रमाणे, हा स्नॅक तयार करण्यासाठी फक्त चार पदार्थ लागतात.
१ चमचा साजूक तूप
थोडा गूळ
शेंगदाण्याचं कूट
ताजं किसलेलं खोबरं
हे सर्व साहित्य एकत्र करून छोटा लाडू किंवा मिश्रण तयार करून खाऊ शकता. हा स्नॅक अवघ्या दोन मिनिटांत तयार होतो.
त्वचेसाठी हे पदार्थ का फायदेशीर?
साजूक तूपामध्ये हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करतात. गुळामध्ये आयर्न आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि चांगले फॅट्स आढळतात, तर खोबरं शरीराला आवश्यक पोषक घटक पुरवतं. या सर्व पदार्थांचा संतुलित आहाराचा भाग म्हणून समावेश केल्यास त्वचेचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होऊ शकते.
फक्त स्नॅक पुरेसा नाही...
निरोगी आणि तजेलदार त्वचेसाठी केवळ एखादा पदार्थ खाणं पुरेसं नसतं. पुरेशी झोप, भरपूर पाणी, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यांचाही त्वचेच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे या स्नॅकसोबत आरोग्यदायी जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे.
(टीप : हा लेख उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आला आहे. त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास किंवा आहारात मोठे बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)