

हिवाळ्यात आवळ्याचा स्वाद आणि पौष्टिकता दोन्हींचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आंबट-गोड आवळा चटणी. ही चटणी फक्त स्वादिष्ट नाही तर इम्युनिटी मजबूत ठेवण्यास सुद्धा मदत करते. जेवणात एक चमचा चटणी घेतली की जेवणाचा आनंद दुप्पट होतो. चला तर मग, पाहुयात ही पोषक तत्वांनी भरपूर आवळा चटणी तयार करण्याची सोपी रेसिपी.
साहित्य (४-५ लोकांसाठी) :
आवळे - ४०० ग्रॅम
मनुके - १ चमचा
मोहरीचं तेल - २ मोठे चमचे
भाजलेले जिरे - १ छोटा चमचा
बडीशेप - १ छोटा चमचा
मीठ - चवीनुसार
तिखट - १ छोटा चमचा
भाजलेली बडीशेप पावडर - १ मोठा चमचा
हळद - अर्धा चमचा
गूळ - १०० ग्रॅम
कृती :
सर्वप्रथम आवळे नीट धुवून कुकरमध्ये पाणी घालून २-३ शिट्ट्या येईपर्यंत उकळवा. पर्याय म्हणून आवळे किसूनही वापरता येतात. उकडल्यानंतर थोडे थंड होऊ द्या आणि आवळ्यांच्या फोड्या वेगळ्या करा, बिया काढा.
एका कढईत मोहरीचं तेल गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून फोडणी द्या. त्यानंतर आवळ्याचे तुकडे मंद आचेवर १ मिनिट परतवा. नंतर हळद, मीठ, लाल तिखट, धण्याची पूड, जिऱ्याची पूड आणि मनुका घालून २ मिनिटे शिजवा.
भाजलेल्या बडीशेप पावडर आणि गूळ घालून ३-४ मिनिटे हलक्या आचेवर शिजवा, गूळ नीट वितळून मिश्रणात मिसळत राहा. या प्रक्रियेनंतर अंदाजे अर्ध्या तासात आंबट-गोड आवळा चटणी तयार होते. दररोज १ चमचा ही चटणी खाल्ल्यास हिवाळ्यात इम्युनिटी वाढण्यास मदत होते आणि जेवणाची चवही खुलते.