

२०२६ या नववर्षातली पहिलीच अंगारकी संकष्टी आज आहे. या खास निमित्ताने गणपती बाप्पांच्या नैवेद्याला उकडीचे मोदक असायलाच हवेत. मोदकांशिवाय बाप्पाचा नैवेद्य अपूर्ण वाटतो, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेकदा उत्साहात मोदक करायला घेतले, की पारी फाटते, सारण बाहेर येतं, कळ्या नीट पडत नाहीत किंवा मोदक वाफवताना चिकटतात. मग मेहनत असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. म्हणूनच यावेळी उकडीचे मोदक करताना या सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स नक्की लक्षात ठेवा.
उकडीचे मोदक परफेक्ट होण्यासाठी खास टिप्स
मोदकाचं सारण करताना ओला, पांढराशुभ्र नारळ वापरा. नारळ एकसारखा खोवलेला असावा. गूळ फार चिकट किंवा फार कडक नको; हलका लालसर गूळ वापरल्यास सारण छान लागतं. चवीत भर घालण्यासाठी गूळ–नारळात थोडासा खवा घातला, तर सारण अधिकच स्वादिष्ट होतं.
उकडीसाठी शक्यतो आंबेमोहोर तांदूळ वापरा. खूप जाड किंवा साधे तांदूळ घेतले, तर पारी चिकट होते किंवा तुटते. उकड काढताना पाणी अचूक प्रमाणात असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे पीठ ना फार सैल होईल ना फार घट्ट.
मोदक वाफवायच्या आधी किमान ५ मिनिटं मोदकपात्र गॅसवर ठेवून पाणी उकळत ठेवा. मोदक ठेवायच्या चाळणीला किंवा पात्राला केळीचं पान किंवा थोडंसं तेल लावलं, तर मोदक चिकटत नाहीत आणि छान सुगंधही येतो.
अनेकांना मोदकाच्या कळ्या नीट पाडणं जमत नाही. यासाठी छोट्या चमच्याचा वापर करा. उकडीच्या पिठाचा गोळा नीट मळून घेतल्यानंतर चमच्याने हलक्या हाताने कळ्या पाडल्या, तर मोदक सुबक दिसतात.
हाताला थोडंसं तेल लावून पिठाची पारी तयार करा. ती फार पातळ किंवा फार जाड नसावी. पारीत सारण भरल्यानंतर सर्व बाजूंनी नीट बंद करा. वरून हलक्याच हाताने कळीदार आकार द्या.
आणखी काही उपयोगी टिप्स & ट्रिक्स
मोदक ठेवताना एकमेकांना चिकटवू नका.
वाफवताना मध्यम आचेवर १५ मिनिटं मोदक शिजवा.
हळदीच्या पानात मोदक वाफवले, तर चव आणि सुगंध दोन्ही वाढतात.
गरमागरम मोदकांवर थोडंसं तूप सोडलं, तर नैवेद्य अधिकच खास लागतो.
यंदाच्या अंगारकी संकष्टीला या टिप्स फॉलो करा आणि घरच्या घरी सुबक, मऊ, कळीदार आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक नक्की बनवा.