
सोनं-चांदी महाग झाल्याने अनेक महिला सण-समारंभासाठी आर्टिफिशियल दागिन्यांनाच पसंती देतात. पण हे दागिने काही दिवस वापरले नाहीत की ते काळसर होतात. अशा वेळी नवे दागिने घ्यायची गरज नाही, कारण घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही त्यांना पुन्हा नवी झळाळी देऊ शकता.
काही सोप्या ट्रिक्स पुढीलप्रमाणे :
बेकिंग सोडा आणि पाणी
बेकिंग सोडा जवळपास प्रत्येक घरात असतो. अर्धा कप पाण्यात एक चमचा सोडा मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट दागिन्यांवर लावून मऊ ब्रशने हलक्या हाताने स्वच्छ करा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. यामुळे काळपटपणा लगेच निघून जातो.
टूथपेस्ट
दात घासण्यासाठी वापरण्यात येणारी टूथपेस्ट दागिन्यांसाठीसुद्धा उत्तम ठरते. थोडी पेस्ट दागिन्यांवर लावून ब्रशने हलक्या हाताने घासा. मग पाण्याने धुऊन कोरडे करा. दागिने पुन्हा एकदम नवीन दिसतील.
व्हिनेगर आणि मीठ
एका भांड्यात कोमट पाणी, एक चमचा पांढरा व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ घाला. दागिने यात १५ मिनिटे भिजवा. या उपायाने दागिन्यांवरची घाण सहज निघते. त्यानंतर ते धुऊन कापडाने पुसून वाळवा.
लिंबाचा रस
लिंबाच्या रसात दागिने ५-१० मिनिटे ठेवले तर त्यावरील गंज व काळसरपणा सहज निघतो. त्यानंतर मऊ कापडाने घासून स्वच्छ पाण्याने धुवा. दागिने पुन्हा झगमगू लागतात.
दागिन्यांची चमक जास्त काळ टिकवण्यासाठी टिप्स :
दागिने वापरल्यानंतर नेहमी मऊ कापडाने स्वच्छ करून ठेवा.
हार, झुमके, अंगठ्या वेगवेगळ्या पाउच किंवा बॉक्समध्ये ठेवा, त्यामुळे ऑक्सिडायझेशन टळेल.
कोणतेही स्ट्रॉंग क्लीनर वापरणे टाळा.
दागिने घासण्यासाठी कधीही कडक ब्रश वापरू नका, त्यामुळे दागिन्यांवर ओरखडे येऊ शकतात. मऊ कापड किंवा जुना टूथब्रश वापरा.
या सोप्या घरगुती उपायांमुळे तुमचे आवडते आर्टिफिशियल दागिने पुन्हा नव्यासारखे चमकतील आणि प्रत्येक सण-समारंभात तुमचा लूक उठून दिसेल.
(Disclaimer: या माहितीमध्ये दिलेले सल्ले सामान्य माहितीवर आधारित आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)