

येत्या काळात आकाशातील एक दुर्मिळ आणि थक्क करणारा नजारा पाहायला मिळणार आहे, 'शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण'! हे ग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी होणार असून, सुमारे ६ मिनिटे २३ सेकंद पृथ्वीवर अंधार पसरवणार आहे. इतक्या दीर्घ काळासाठी सूर्य लपण्याची ही घटना शंभर वर्षांत एकदाच पाहायला मिळते, त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ, संशोधक आणि विज्ञानप्रेमी यांच्यासाठी हे ग्रहण एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
हे पूर्ण सूर्यग्रहण कुठे पाहायला मिळेल?
हे पूर्ण सूर्यग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका आणि अरबस्तानच्या काही भागात दिसेल. अटलांटिक महासागरातून सुरू होऊन, ते जिब्राल्टर, दक्षिण स्पेन, मोरोक्को, अल्जेरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त मार्गे सौदी अरेबिया, येमेन आणि सोमालिया येथे समाप्त होईल. या काळात कॅडिझ आणि मालागा ही स्पॅनिश शहरे जवळपास चार मिनिटांहून अधिक वेळ पूर्ण अंधारात राहतील. तर इजिप्तमधील लक्सर येथे सहा मिनिटांचा घनदाट अंधार पसरलेला असेल.
भारतात दिसणार का ?
मात्र भारतीय खगोलप्रेमींसाठी थोडी खंताची गोष्ट म्हणजे हे सूर्यग्रहण भारतामध्ये दिसणार नाही. तरीही जगभरातील वैज्ञानिक या घटनेचा सखोल अभ्यास करणार आहेत. इतिहासात याआधी इतक्या वेळ चाललेलं सूर्यग्रहण इ.स.पूर्व ७४३ मध्ये झालं होतं, जे जवळपास ७ मिनिटे २८ सेकंद चाललं होतं.
पुन्हा कधी पाहायला मिळेल?
तज्ञांच्या अंदाजानुसार, २०२७ नंतर अशा प्रकारचं सूर्यग्रहण पुन्हा २११४ साली होईल. त्यामुळे २ ऑगस्ट २०२७ हे तारखेसाठी खगोलविश्वात सुवर्णाक्षरांनी नोंद होणार हे निश्चित!