बकलावा : अरब देशांच्या शाही दरबारातील गोड पदार्थ आता भारतीयांच्या पंक्तीत!

हिंदी बिग बॉसमुळे सध्या 'बकलावा' ही मिठाई व्हायरल होत आहे. बिग बॉसमधील स्पर्धक तानिया मित्तल केवळ बकलावा खाण्यासाठी दुबई प्रवास करते. हे ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले. पण, फक्त बकलावा हा काही दुबईत मिळत नाही. तर तो भारतातही मिळतो.
(Photo - Canva)
(Photo - Canva)
Published on

हिंदी बिग बॉसमुळे सध्या 'बकलावा' ही मिठाई व्हायरल होत आहे. बिग बॉसमधील स्पर्धक तानिया मित्तल केवळ बकलावा खाण्यासाठी दुबई प्रवास करते. हे ऐकून अनेकजण आश्चर्यचकित झाले. पण, फक्त बकलावा हा काही दुबईत मिळत नाही. तर तो भारतातही मिळतो. बकलावा केवळ मिठाई नसून शाही पदार्थांमध्ये गणला जातो. नेमका काय आहे हा पदार्थ चला तर जाणून घेऊया.

भारत हा गोड पदार्थांचा खजिना आहे. रसगुल्ला, जिलेबी, काजू कतली, लाडू अशा असंख्य मिठाया इथे मिळतात. पण, गेल्या काही वर्षांत एक परदेशी गोड पदार्थ भारतीयांच्या ताटात शाही ठसा उमटवू लागला आहे - बकलावा. कुरकुरीत थर, नट्सची चव आणि गोड सरबताने भरलेला हा पदार्थ दिसायलाही सुंदर, आणि खायला तर अविस्मरणीय!

बकलावाचा उगम

बकलावा हा भारतीय गोड पदार्थ नसून त्याची सुरुवात अरब, तुर्की, ग्रीस, मध्य आशिया देशांत झाली. त्याचा पहिला उल्लेख १६५० च्या आसपासचा सापडतो. त्याला ऑट्टोमन साम्राज्यातील शाही दरबारात मान मिळाला. ईदसारख्या उत्सवात बकलावा हा अनिवार्य गोड पदार्थ मानला जात असे. त्याशिवाय सण अपूर्ण वाटायचा. हळूहळू हा स्वाद ग्रीस, लेबनॉन आणि मग जगभर पसरला.

शाही जेवणाची आठवण करून देणारा स्वाद

बकलावा बनवण्यासाठी फक्त पीठ, पाणी, बटर आणि सुकामेवा हे चारच घटक लागतात. मात्र, त्याच्या थरांमध्ये केलेली कौशल्यपूर्ण सजावट आणि गोड सरबतामुळे तो खास बनतो. प्रत्येक घासात कुरकुरीतपणा आणि नट्सची क्रिमी टेक्श्चर यामुळे तो इतर मिठायांपेक्षा वेगळा ठरतो.

भारतात बकलावाचा प्रवास

भारतामध्ये बकलावा गेल्या काही वर्षांत लोकप्रिय झाला. मोठ्या सणांमध्ये, लग्नसमारंभात आणि ईद-दीवाळीच्या भेटवस्तूंमध्ये तो खास करून दिला जातो. त्याच्या शाही सादरीकरणामुळे लोकांना राजदरबारी जेवणाची आठवण होते. भारतीय मिठाईच्या दुकानांत आणि पाचतारांकित हॉटेलांत आता बकलावा सहज मिळतो. भारतात काजू कतली ही सर्वात महाग मिठाई मानली जाते. पण, बकलावाची किंमत त्यापेक्षा जास्त आहे. कारण त्याची मेहनत, आयात केलेला सुकामेवा आणि आंतरराष्ट्रीय मागणी यामुळे बकलावा आज लक्झरी मिठाई म्हणून गणली जाते.

बकलावाचे टॉप ५ लोकप्रिय प्रकार

  • पिस्ता बकलावा - कुरकुरीत थरांमध्ये पिस्त्यांचा जबरदस्त क्रंच आणि गोडसर चव.

  • वॉलनट बकलावा - अक्रोडामुळे मिळणारा थोडा कडसर आणि समृद्ध स्वाद.

  • चॉकलेट बकलावा - पारंपरिक चवीला आधुनिक ट्विस्ट; तरुणाईत खूप लोकप्रिय.

  • हनी बकलावा - साखरेऐवजी मधात भिजवलेले थर, गोडपणात हलकीशी नैसर्गिक झाक.

  • मिक्स्ड नट्स बकलावा - काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड सगळ्यांचा संगम; सर्वात श्रीमंत प्रकार.

बकलावा हा फक्त गोड पदार्थ नाही, तर इतिहास, संस्कृती आणि शाही परंपरेचा संगम आहे. तुर्कीच्या राजदरबारातून निघालेल्या या गोड पदार्थाने भारतीय सण आणि खास क्षणांमध्ये जागा मिळवली आहे.

logo
marathi.freepressjournal.in