

घरातील बाल्कनी, गच्ची किंवा खिडकीजवळ लावलेली हिरवीगार रोपं घराचं सौंदर्य वाढवतात. मात्र योग्य पोषण न मिळाल्यास रोपांची वाढ खुंटणे, पाने पिवळी पडणे किंवा फुलं कमी येणं, अशा समस्या अनेकांना जाणवतात. अशावेळी महागडी खतं वापरण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास रोपांना चांगला फायदा होऊ शकतो.
त्यापैकीच एक प्रभावी उपाय म्हणजे केळीची साल. केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि इतर पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात, जे रोपांच्या वाढीसाठी फायदेशीर मानले जातात.
१. केळीच्या सालीचं लिक्विड खत
रोपांना झटपट पोषण देण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरू शकतो.
कसं तयार कराल?
केळीच्या सालींचे छोटे तुकडे करा
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात हे तुकडे टाका
भांडं ३ दिवस झाकून ठेवा
दरम्यान मिश्रण हलवत राहा
नंतर गाळून त्यात साधं पाणी मिसळा
तयार द्रावण रोपांच्या मुळाशी घातल्यास फुलं आणि वाढ सुधारण्यास मदत होऊ शकते.
२. साली थेट मातीत मिसळा
वेळ कमी असेल तर हा सोपा उपाय करून पाहू शकता.
काय कराल?
केळीच्या सालींचे छोटे तुकडे करा
कुंडीतील वरची माती हलकी बाजूला करा
साली मातीत पुरून पुन्हा माती झाकून ठेवा
हळूहळू साली विरघळून माती अधिक सुपीक होण्यास मदत करतात.
३. सालींची पावडर तयार करा
दीर्घकाळासाठी खत साठवून ठेवायचं असेल तर हा उपाय उपयोगी ठरतो.
कसं बनवाल?
केळीच्या साली उन्हात पूर्ण वाळवा
मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा
हवाबंद डब्यात साठवा
ही पावडर रोपांच्या मातीवर टाकल्यास पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.
कोणत्या रोपांसाठी फायदेशीर?
जास्वंद
गुलाब
मोगरा
तुळस
इनडोअर प्लांट्स
फुलझाडं आणि भाजीपाल्याची रोपं
नैसर्गिक खताचा फायदा काय?
मातीचा पोत सुधारतो
रोपांची वाढ चांगली होते
फुलं आणि पाने अधिक टवटवीत दिसू शकतात
रासायनिक खतांचा वापर कमी होतो
घरातील टाकाऊ केळीच्या साली फेकून न देता त्यांचा योग्य वापर केल्यास कमी खर्चात रोपांची उत्तम निगा राखता येऊ शकते.