
साहसाच्या आवडीने नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्यासाठी गेलेल्या भारतीताईंनी, नर्मदा तटावर शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवली. आदिवासी मुलांसाठी 'नर्मदालय' ही संस्था स्थापन करून त्यांनी एक नवा मार्ग दाखवला. त्यांच्या कार्याने अनेक आयुष्ये बदलली आणि समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. नवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त, शिक्षणव्रती भारती ठाकूर यांची ही प्रेरणादायक कहाणी.
नाशिकच्या कन्या असलेल्या भारती ठाकूर हे नाव आज नर्मदा घाटीपर्यंत परिचित आहे. साहसाची आवड अंगात असल्याने त्यांनी गिरिभ्रमण, सायकल मोहिमा अशा अनेक साहसकृती यशस्वी केल्या. विवेकानंद केंद्रात कन्याकुमारीत वास्तव्य करताना वाचन, चिंतन आणि विद्वानांशी झालेल्या चर्चांमधून त्यांच्या मनात एक नवा विचार अंकुरला - नर्मदा परिक्रमेचा.
१४ ऑक्टोबर २००५ रोजी त्यांनी ही परिक्रमा सुरू केली आणि १२ मार्च २००६ रोजी ती पूर्णत्वास गेली. पाच महिन्यांच्या या प्रवासात त्यांनी केवळ निसर्गसौंदर्य आणि अध्यात्माचा अनुभव घेतला नाही, तर नर्मदेत बांधल्या जाणाऱ्या धरणांमुळे हरवत चाललेली परंपरा, संस्कृती आणि जैवविविधता प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून नोंदवली. हा प्रवास नंतर ‘नर्मदा परिक्रमा - एक अंतर्यात्रा’ या पुस्तकातून वाचकांसमोर आला.
शिक्षणसेवेची सुरुवात
या प्रवासात भारतीताईंना एक कठोर वास्तव जाणवले - नर्मदा घाटातील असंख्य मुलांना शिक्षणाचा स्पर्शही नाही. हातात फुले विकणारी, नारळ गोळा करणारी, श्रमांमध्ये गुरफटलेली ही बालके पाहून त्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. शेवटी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि या मुलांसाठी शिक्षणाची वाट मोकळी करण्याचा संकल्प केला.
स्वतःच्या पेन्शनच्या पैशातून मंडलेश्वर येथे राहून त्यांनी आदिवासी मुलांसाठी आणि महिलांसाठी काम सुरू केले. रोजची दहा-बारा किलोमीटरची पायपीट करून त्या गावोगावी पोहोचत, पालकांना समजावून सांगत आणि मुलांना शाळेत आणत. सुरुवातीला थोडीशी मुले या उपक्रमाशी जोडली गेली, पण हळूहळू या चळवळीला पाठीराखे मिळत गेले आणि २००२ मध्ये ‘नर्मदालय’ संस्थेचा औपचारिक जन्म झाला.
नर्मदालयाचे कार्य
आज नर्मदालयाच्या शाळांमध्ये १७०० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. औपचारिक शिक्षणाबरोबरच सुतारकाम, वेल्डिंग, शेती, दुग्धव्यवसाय यांसारखे व्यवसायाभिमुख प्रशिक्षणही दिले जाते. मुलांना मोफत भोजन आणि शिक्षणाची सोय आहे. या संस्थेच्या रामकृष्ण शारदा निकेतन शाळेला मध्य प्रदेशातील पहिली डिजिटल शाळा होण्याचा मान मिळाला आहे.
अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता झाले, तर ग्रामीण महिला शिक्षिका बनून रोजगाराच्या मार्गावर उभ्या राहिल्या. शाळेचे शिक्षक प्रशिक्षण हे त्यांच्या जीवनासाठी कायम प्रेरणादायी ठरत आहे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता देणगी आणि लोकसहभागातून हे काम पुढे नेले जाते.
आजूबाजूच्या खेड्यांतून शिकण्यासाठी येणाऱ्या मुलांसाठी निवासस्थान ‘नचिकेत छात्रावास देखील उभारण्यात आला आहे. शाळा व छात्रावासाजवळ उभारलेला गोशाळा प्रकल्प आणि ‘नर्मदा निर्मिती’ शिलाई विभाग ग्रामीण महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी सुरू केलेला हा उपक्रम. या अशा उत्पादनांना विविध प्रदर्शनांतून बाजारपेठ मिळते.
अखंड तपश्चर्येचा वटवृक्ष
आज नर्मदालय शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा एक बहुआयामी केंद्रबिंदू ठरला आहे. एका नागा साधूने संस्थेला दिलेल्या जागेवर उभा राहिलेला हे आश्रम आज समाजासाठी दीपस्तंभ ठरतो आहे.