चंद्रकोर टिकली: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची झळाळती खूण! जाणून घ्या अध्यात्मिक महत्त्व...

आजच्या काळात फॅशन बदलते, ट्रेंड येतात आणि जातात. पण एक गोष्ट आहे जी आजही तितकीच तेजस्वी आहे, ती म्हणजे चंद्रकोर टिकली. कपाळावर अर्धचंद्राच्या आकारात लावली जाणारी ही लाल टिकली केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नाही, तर...
चंद्रकोर टिकली: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेची झळाळती खूण! जाणून घ्या अध्यात्मिक महत्त्व...
Published on

आजच्या काळात फॅशन बदलते, ट्रेंड येतात आणि जातात. पण, एक गोष्ट आहे जी आजही तितकीच तेजस्वी आहे, ती म्हणजे चंद्रकोर टिकली. कपाळावर अर्धचंद्राच्या आकारात लावली जाणारी ही लाल टिकली केवळ सौंदर्यवृद्धीसाठी नाही, तर महाराष्ट्राच्या अभिमानाचं जिवंत प्रतीक म्हणूनही ओळखली जाते.

कधी विचार केला आहे का, स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी ही चंद्रकोर एवढी खास का आहे? याचं उत्तर शोधायला गेलं, की आपण पोहोचतो थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात!

स्वराज्याचं आणि आत्मसन्मानाचं प्रतीक

चंद्रकोर टिकली ही केवळ एक फॅशन स्टेटमेंट नव्हती. तर, ती शिवकाळात स्वराज्याची निशाणी मानली जायची. असे मानले जाते, की चंद्रकोर टिकली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकप्रिय केली होती. स्वराज्याच्या शक्ती, लवचिकता आणि अभिमानाचे प्रतीक म्हणून पुरुष आणि स्त्रिया दोघेही ती परिधान करत असत. कपाळावरची ही चंद्रकोर पुरुषांसाठी त्यांच्या शौर्याची, आत्मसन्मानाची आणि आपल्या भूमीशी असलेल्या नात्याची खूण होती. तर, स्त्रियांसाठी ही टिकली सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कवच होती. जणू, तिच्या कपाळावरची ही चंद्रकोर स्वतः बोलायची, "मी जागी आहे, मी इथली आहे, आणि माझ्या मूल्यांवर मी ठाम आहे."

चंद्रकोरीचा अध्यात्मिक अर्थ

काही लोकांना चंद्रकोर ही फक्त एक चंद्राकृती लाल टिकली वाटत असेल, पण तिची जागा आणि तिचा आकार याचा अर्थही तितकाच खोल आहे.

दोन भुवयांमध्ये कपाळाच्या मध्यावर चंद्रकोर लावली जाते. या जागेला योगशास्त्रात 'आज्ञा चक्र' म्हणतात. दोन्ही भुवयांच्या मधली ही जागा सजगतेची, एकाग्रतेची आणि स्थैर्याची मानली जाते.

नावाप्रमाणे अर्धचंद्रकारात असलेल्या ह्या टिकलीला चंद्राचं शीतल आणि शाश्वत रूप शिवतत्त्वाचं प्रतीक मानतात. चंद्र जसा आपल्या प्रकाशाने अंधार दूर करतो आणि थंडावा देतो. त्याप्रमाणेच कपाळावरील चंद्रकोर ही शांतता आणि प्रसन्नतेचे प्रतीक मानली जाते.

पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही टिकली

अनेक महाराष्ट्रीय घरांमध्ये आज्जींकडून नातवंडांपर्यंत चंद्रकोर टिकलीचा हा सन्मान हस्तांतरित होत आहे. ही चंद्रकोर कुंकू किंवा रोलीमध्ये बुडवून तांब्याच्या वस्तूने कपाळावर काढली जाते.

आजही महाराष्ट्रात गुढीपाडवा, गणपती, लावणी, पोवाडे अशा उत्सवात अनेकजण अभिमानाने ही चंद्रकोर आपल्या भाळी मिरवतात.

ही टिकली म्हणजे, आपण जिथून आलो आहोत, जी मूल्ये घेऊन मोठे झालो आहोत, ती संस्कृती आपण विसरू नये, याची आठवण आहे.

logo
marathi.freepressjournal.in