
मुंबई, दिल्ली आणि बंगळुरूसारखी मेट्रो शहरे आजही अनेकांसाठी स्वप्नांची राजधानी आहेत. रोजगार, शिक्षण आणि स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी देशभरातून लाखो तरुण आणि कुटुंब या मेट्रो शहरांकडे वळतात. या शहरांचा झगमगाट, गगनचुंबी इमारती, वेगवान जीवनशैली आणि चकचकीत राहणीमान यामागे 'रोजगार' हे खरं कारण असतं. पण, आता एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतोय तो म्हणजे या मेट्रो शहरांचं वर्चस्व संपतंय का? चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद ही शहरे नव्या संधीची ठिकाणे बनत आहेत का? कारण Indeed च्या नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या ‘PayMap Survey 2025’ नुसार, पारंपरिक मेट्रो शहरांऐवजी चेन्नई, हैदराबाद आणि अहमदाबाद यांसारखी उदयोन्मुख शहरे वेतनवाढीच्या आणि करिअर संधींच्या बाबतीत आघाडीवर असल्याचे समोर आले आहे. तर, चेन्नई फ्रेशर्ससाठी सॅलरीचा नवा हॉटस्पॉट ठरतंय.
फ्रेशर्ससाठी सर्वाधिक वेतन देणारं शहर - चेन्नई
चेन्नईने ‘एन्ट्री लेव्हल जॉब्स’मध्ये सर्वाधिक वेतन देऊन इतर शहरांना मागे टाकलं आहे. ‘PayMap Survey’ नुसार, फ्रेशर्स म्हणजे ० ते २ वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना चेन्नईत सरासरी ३०,१०० रुपये दरमहा वेतन दिले जात आहे.
अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोत्तम वेतन देणारे हैदराबाद शहर -
या सर्वेनुसार, हैदराबादने ५ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक वेतन देणारे शहर म्हणून आघाडीचे स्थान मिळवलं आहे. या श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरमहा सरासरी ६९,७०० रुपयांपर्यंत पगार मिळतो, जो इतर मेट्रो शहरांपेक्षा अधिक आहे.
ही आकडेवारी हैदराबादच्या आयटी (IT), फार्मा आणि स्टार्टअप क्षेत्रातील वेगाने होणाऱ्या वाढीचे प्रतीक मानलं जात आहे. उच्च कौशल्यधारक व्यावसायिकांची वाढती मागणी आणि ग्लोबल कंपन्यां गुंतवणुकीकडं झुकणं यामुळे हे शहर अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी एक प्रमुख केंद्रबिंदू ठरतंय.
कौशल्यांनुसार वेतन आणि प्रमुख क्षेत्रांची आकडेवारी -
तर, कौशल्यांनुसार वेतन आणि प्रमुख क्षेत्र पाहता, IT/ITeS क्षेत्राने सर्व स्तरांमध्ये आघाडी घेतली आहे. Indeed च्या ‘PayMap Survey 2025’ अहवालानुसार, डिजिटल आणि AI आधारित नोकऱ्यांमुळे या क्षेत्रात फ्रेशर्सना सरासरी २८,६०० तर ५ ते ८ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना ६८,९०० पर्यंत वेतन दिले जात आहे. याशिवाय, उत्पादन क्षेत्रात ६८,२००, टेलिकॉममध्ये ६७,७००, ई-कॉमर्समध्ये ६६,९००, तर हेल्थकेअर आणि फार्मा क्षेत्रात ६६,००० पर्यंत पगार मिळतो.
तांत्रिक कौशल्याबरोबरच सर्जनशीलतेलाही आजच्या युगात महत्त्व असून, UI/UX कर्मचाऱ्यांना आता सॉफ्टवेअर डेव्हलपर्स इतकेच म्हणजेच सुमारे ६५,००० पर्यंत वेतन मिळू लागले आहे. याचबरोबर, प्रॉडक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसारख्या नेतृत्वक्षम पदांवर कार्यरत वरिष्ठांना सर्वाधिक ८५,५०० पर्यंत पगार दिला जात असल्याचेही या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
Indeed च्या सर्वेमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब निदर्शनास आली आहे. आर्थिक संधीसाठी मेट्रो शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या पगारातून जीवनशैलीत संतुलन (Work Balance) ठेवणे कठीण जातंय. दिल्लीतील ९६%, मुंबई ९५%, पुणे ९४%, तर बंगळूरूमध्ये ९३% कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत असल्याने तडजोड करावी लागत आहे. तर, दुसरीकडे याच्या तुलनेत हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्ये पगार आणि जीवनशैली यामध्ये चांगलं संतुलन (Work Balance) आढळून आले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना ही शहरे सोडण्याचं मन होत नाही.
याचाच अर्थ एकेकाळी स्वप्न पाहण्याचे ठिकाण असलेली मुंबई, दिल्ली सारखी ठिकाणे सोडून नवी पिढी हैदराबाद, अहमदाबाद, चेन्नईसारख्या शहरांना पसंती देताना दिसतंय. ही शहरे ‘सॅलरी हब्स’ म्हणून उदयास येताना दिसत आहेत.