
अनेकांना ब्लडप्रेशर कमी झाल्यावर अचानक अशक्तपणा, चक्कर येणे, हातापायांना थरथर, डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखं वाटतं. अशावेळी 'एक कप गरम कॉफी' हा घरगुती उपाय अनेकजण करतात आणि तो तात्पुरता उपयोगीही ठरतो. कारण, कॉफीमधील कॅफिन (Caffeine) शरीरातील रक्तदाब काही काळासाठी वाढवते. पण मग कॉफी नियमित प्यायल्याने रक्तदाब वाढतो का? म्हणजेच ती उच्च रक्तदाबाचं (Hypertension) कारण ठरू शकते का?
कॉफीमुळे ब्लडप्रेशर वाढतं का?
वैद्यकशास्त्र आणि अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासांनुसार, उत्तर आहे “नाही, पण प्रमाण महत्त्वाचं आहे.”
कॅफिन हे शरीरातील एड्रेनालिन या हार्मोनची पातळी वाढवतं, ज्यामुळे रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचन पावतात आणि रक्तदाबात तात्पुरती वाढ दिसून येते. मात्र ही वाढ तात्पुरती असते. साधारणतः ३० मिनिटांपासून १ तासापर्यंत.
निरोगी व्यक्तींमध्ये दिवसाला १ ते २ कप कॉफी पिणं रक्तदाबासाठी हानिकारक ठरत नाही. मात्र, आधीपासून उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी किंवा ज्यांना कॅफिनला संवेदनशीलता आहे त्यांनी कॉफीचं प्रमाण मर्यादित ठेवणं आवश्यक आहे.
रक्तदाबावर कॉफीचा परिणाम व्यक्तिनिहाय बदलतो
वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात कॅफिनचं विघटन वेगळ्या गतीने होतं. काही लोकांमध्ये कॉफी प्यायल्यावर रक्तदाब वाढतो, तर काहींवर त्याचा परिणाम होत नाही. यामागे जनुकीय घटक (Genetics) महत्त्वाचे ठरतात. शरीरातील CYP1A2 नावाच्या एन्झाइमच्या कार्यक्षमतेनुसार कॉफीचं मेटाबॉलिझम बदलतं. ज्यांचं हे एन्झाइम हळू काम करतं, त्यांच्यात कॅफिनचा परिणाम अधिक काळ टिकतो आणि रक्तदाब थोडा वाढलेला राहू शकतो.
कॉफी ही उच्च रक्तदाबाचे थेट कारण नाही
वैद्यकीयदृष्ट्या उच्च रक्तदाबाचे (Hypertension) प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत -
आनुवंशिकता
जास्त वजन आणि चरबी
धूम्रपान व मद्यपान
व्यायामाचा अभाव
मीठ आणि चरबीयुक्त आहार
मानसिक ताणतणाव
किडनीच्या कार्यात बिघाड
शहरी जीवनशैली
या सर्व घटकांशिवाय फक्त कॉफीमुळे उच्च रक्तदाब होत नाही, असं अनेक संशोधनांत स्पष्टपणे नमूद आहे.
कमी रक्तदाबात कॉफी ‘फर्स्ट एड’सारखी
कमी रक्तदाब (Hypotension) झाल्यास शरीरात रक्तप्रवाह कमी होतो आणि त्यामुळे चक्कर येते किंवा बेशुद्धी येऊ शकते. अशा वेळी एक कप कॉफी पिणं शरीरातील रक्तदाब तात्पुरता वाढवून एनर्जी बूस्ट देतं. म्हणूनच डॉक्टरही काही वेळा तात्पुरत्या परिस्थितीत कॉफी घेण्याचा सल्ला देतात.
मात्र, ही तात्पुरती उपाययोजना आहे. वारंवार रक्तदाब कमी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन कारण शोधणं आवश्यक आहे.
किती कॉफी सुरक्षित?
दिवसाला १ ते २ कप (२००-३०० मिग्रॅ कॅफिन) हे प्रमाण निरोगी व्यक्तीसाठी सुरक्षित मानलं जातं.
गर्भवती स्त्रिया, वृद्ध, किंवा हृदयविकार/उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी १ कपपेक्षा जास्त कॉफी घेऊ नये.
रात्रीच्या वेळेत कॉफी टाळल्यास झोपेवर होणारा परिणाम टाळता येतो.
कॉफी ब्लडप्रेशर वाढवते हे खरं, पण थोड्या वेळासाठीच. नियमित मर्यादित प्रमाणात कॉफी पिणं आरोग्यासाठी सुरक्षित आहे, मात्र जास्त प्रमाणात सेवन केल्यास झोप, हृदयाचे ठोके आणि ताण-तणावावर परिणाम होऊ शकतो.
(कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारींसाठी किंवा ब्लडप्रेशरवरील उपचारासाठी नेहमी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)