तुमची प्लेट जितकी रंगीत, तितकं आरोग्य उत्तम! प्रत्येक रंग सांगतो आरोग्याचा मंत्र

आपण नेहमी ऐकतो की हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, कारण त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण खरं आरोग्य फक्त हिरव्या भाज्यांमध्ये नाही, तर सर्व रंगांच्या भाज्या आणि फळांमध्ये दडलेलं आहे. म्हणजेच तुमच्या प्लेटमध्ये जितके रंग, तितके आरोग्याचे फायदे.
तुमची प्लेट जितकी रंगीत, तितकं आरोग्य उत्तम! प्रत्येक रंग सांगतो आरोग्याचा मंत्र
Published on

आपण नेहमी ऐकतो की हिरव्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, कारण त्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. पण खरं आरोग्य फक्त हिरव्या भाज्यांमध्ये नाही, तर सर्व रंगांच्या भाज्या आणि फळांमध्ये दडलेलं आहे. म्हणजेच तुमच्या प्लेटमध्ये जितके रंग, तितके आरोग्याचे फायदे.

तज्ञांच्या मते, एकाच प्रकारचं अन्न किंवा भाजी खाल्ल्याने शरीराला मर्यादित पोषक घटक मिळतात. पण प्लेटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळे असतील तर शरीराला विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळतात. म्हणूनच पोषणतज्ज्ञ नेहमी रंगीत सॅलड खाण्याचा सल्ला देतात.

लाल रंग - हृदय व त्वचेचे रक्षण

टोमॅटो, बीट, स्ट्रॉबेरी, टरबूज यांसारख्या लाल भाज्या आणि फळांमध्ये लायकोपीन आणि अँथोसायनिन मुबलक प्रमाणात असतात. हे घटक हृदयाचे आरोग्य सुधारतात, त्वचेला चमकदार ठेवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात. नियमित लाल भाज्या खाल्ल्याने कर्करोगासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

पिवळा-नारिंगी रंग - डोळे व रोगप्रतिकारशक्तीसाठी उत्तम

गाजर, संत्रे, पपई, कॉर्न, पिवळी शिमला मिरची यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि जीवनसत्त्वे अ व क असतात. हे पदार्थ डोळ्यांची दृष्टी सुधारतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि मेंदू तंदुरुस्त ठेवतात. विशेषतः मुलं व ज्येष्ठ नागरिकांसाठी हे पदार्थ हाडे मजबूत करण्यात आणि त्वचा निरोगी ठेवण्यात मदत करतात.

हिरवा रंग - डिटॉक्स आणि वजन नियंत्रण

पालक, ब्रोकोली, काकडी, हिरवे सफरचंद यांसारख्या भाज्या आणि फळांमध्ये लोह, कॅल्शियम, क्लोरोफिल असतात. हे घटक पचनसंस्था सुधारतात, शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात. हिरव्या भाज्या वजन कमी करण्यासाठीही प्रभावी मानल्या जातात.

निळा-जांभळा रंग - स्मरणशक्ती आणि मूत्रपिंडांसाठी लाभदायी

ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, वांगी, द्राक्षे यांसारख्या निळसर-जांभळ्या पदार्थांमध्ये अँथोसायनिन्स आणि रेझवेराट्रोल आढळतात. हे घटक स्मरणशक्ती सुधारतात, वृद्धत्वाचा परिणाम कमी करतात आणि हृदय निरोगी ठेवतात. विशेष म्हणजे ब्लूबेरी व द्राक्षे मूत्रपिंडांसाठी खूप फायदेशीर आहेत.

पांढरा रंग - रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो

कांदे, लसूण, मुळा, मशरूम यांसारख्या पांढऱ्या भाज्यांमध्ये अ‍ॅलिसिन आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. हे घटक कोलेस्टेरॉल कमी करतात, रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

रंगीत प्लेट - नैसर्गिक आरोग्यपूरक

तज्ञ सांगतात की, जर आपण दररोजच्या आहारात ४-५ वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या व फळांचा समावेश केला, तर शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्त्वे मिळतात. अशा वेळी वेगळे पूरक आहार घेण्याची गरजही राहत नाही. म्हणूनच, पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही प्लेटमध्ये सॅलड वाढाल, तेव्हा लक्षात ठेवा जितके रंग, तितकं आरोग्य!

logo
marathi.freepressjournal.in