रोजच्या जेवणात आपण ताज्या भाज्या आणि उत्तम प्रतीचे मसाले मोजून-मापून वापरतो. तरीही अनेकदा घरच्या जेवणाला हॉटेलसारखी चव येत नाही. यामागे एक साधे पण महत्त्वाचे कारण असू शकते. आपण पदार्थात कोणते साहित्य वापरतो, यासोबतच ते नेमक्या कोणत्या टप्प्यावर घालतो, यावरही जेवणाचा रंग, सुगंध आणि चव अवलंबून असते. घाईघाईत फोडणीत चुकीच्या वेळी मीठ किंवा मसाले घातल्यास काही मसाल्यांचा नैसर्गिक सुगंध कमी होऊ शकतो, तर भाज्यांचा रंग आणि पोतही बदलू शकतो.
स्वयंपाक करताना मीठ, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी आणि कोथिंबीर यांचा योग्य वेळी वापर केल्यास पदार्थाची चव अधिक खुलू शकते. त्यासाठी स्वयंपाकातील हे पाच सोपे नियम नक्की लक्षात ठेवा.
१. हळद नेमकी कधी घालावी?
फोडणी तडतडल्यावर लाल तिखट किंवा इतर मसाले घालण्याआधी हळद घालावी. हळदीतील 'करक्यूमिन' हा घटक तेलात मिसळण्यास मदत होते. त्यामुळे भाजीला छान रंग येतो. मात्र, हळद खूप गरम तेलात किंवा जास्त वेळ परतल्यास ती करपू शकते आणि पदार्थाला कडवट चव येऊ शकते. म्हणून हळद घालताना गॅसची आच कमी ठेवावी.
२. भाज्यांनुसार मीठ घालण्याची वेळ ठरवा
प्रत्येक भाजीचा पोत आणि पाणी सोडण्याचे प्रमाण वेगळे असते. त्यामुळे सर्व भाज्यांमध्ये एकाच वेळी मीठ घालणे योग्य ठरत नाही. भोपळा, दोडका यांसारख्या पाणीदार भाज्यांमध्ये सुरुवातीला मीठ घातल्यास त्यातील पाणी बाहेर पडण्यास मदत होते. मात्र, भेंडी परतताना सुरुवातीलाच मीठ घातल्यास ती अधिक ओलसर होऊ शकते. त्यामुळे भेंडी व्यवस्थित परतल्यानंतर मीठ घालणे चांगले. वांग्याच्या भाजीतही कृतीनुसार मीठ घालण्याची वेळ ठरवावी. डाळ किंवा आमटीमध्ये शिजवण्याच्या मधल्या टप्प्यात मीठ घालून शेवटी चव तपासावी.
३. गरम मसाला शेवटी का घालावा?
गरम मसाल्यामुळे भाजी, आमटी किंवा रस्स्याला खमंग सुगंध आणि वेगळी चव मिळते. मात्र, तो सुरुवातीलाच घालून बराच वेळ शिजवल्यास त्यातील काही सुगंधी घटक कमी होऊ शकतात. त्यामुळे भाजी किंवा रस्सा जवळपास शिजल्यानंतर गॅस बंद करण्याच्या साधारण दोन ते तीन मिनिटे आधी गरम मसाला घालावा. यामुळे त्याचा सुगंध आणि स्वाद टिकून राहण्यास मदत होते.
४. कसुरी मेथी कशी आणि कधी वापरावी?
पंजाबी भाज्या, ग्रेव्ही किंवा मसालेदार पदार्थांमध्ये कसुरी मेथीचा वापर केला जातो. पदार्थ तयार होण्याच्या शेवटच्या टप्प्यात कसुरी मेथी दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये हलकी चुरडून घालावी. यामुळे तिचा खमंग सुगंध पदार्थात चांगल्या प्रकारे मिसळतो. मात्र, कसुरी मेथीचे प्रमाण जास्त झाल्यास भाजीला कडवटपणा येऊ शकतो. त्यामुळे तिचा वापर योग्य प्रमाणात करावा.
५. कोथिंबीर सुरुवातीला की शेवटी?
ताजी कोथिंबीर घातल्याने भाजीला छान सुगंध आणि आकर्षक हिरवा रंग मिळतो. मात्र, ती सुरुवातीलाच घालून बराच वेळ शिजवल्यास तिचा ताजेपणा आणि सुगंध कमी होऊ शकतो. त्यामुळे भाजी पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करताना किंवा वाढण्यापूर्वी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
स्वयंपाक करताना कोणते साहित्य वापरतो, याइतकेच ते कोणत्या वेळी वापरतो, हेही महत्त्वाचे असते. त्यामुळे पुढच्या वेळी भाजी, आमटी किंवा रस्सा बनवताना मीठ आणि मसाले घालण्याची योग्य वेळ लक्षात ठेवा. या छोट्या बदलांमुळे रोजच्या जेवणाची चव आणि सुगंध अधिक चांगला होण्यास मदत होईल.