संध्याकाळचा चहा घेताना आपल्याला काहीतरी झटपट पण टेस्टी खायला मिळालं तर किती छान वाटतं ना! दिवसभराच्या कामानंतर घरी आल्यानंतर किंवा मुलं शाळेतून परत आली की त्यांनाही लगेच द्यायला काहीतरी गरमागरम स्नॅक हवं असतंच. त्यातही पावसाळ्यात तर गरमागरम स्नॅक्स खाण्याचा आनंद काही वेगळाच! अशा वेळेस कॉर्न साबुदाणा बॉल्स अगदी परफेक्ट पर्याय आहे. मक्याचा गोडवा, साबुदाण्याची मऊसर चव, बटाट्याची भर आणि दाण्याचं खमंगपणा;सगळ्यांचा मिलाफ एक भन्नाट स्वाद अनुभव देतो. चला तर मग करूया ही सोप्पी आणि झटपट रेसिपी…
साहित्य :
२ मक्याची कणसं
२ उकडलेले बटाटे
१ वाटी भिजवलेला साबुदाणा
१ चमचा जिरे
थोडी चिरलेली कोथिंबीर
¾ वाटी दाण्याचे कूट
२-३ चमचे हिरवी मिरची पेस्ट
चवीनुसार मीठ व साखर
१ चमचा लिंबाचा रस
२ चमचे साजूक तूप
तळण्यासाठी तेल
कृती :
सर्वप्रथम मक्याचे दाणे किसून किंवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत. त्यानंतर उकडलेले बटाटे सोलून बारीक किसून घ्यावेत. मग एका भांड्यात भिजवलेला साबुदाणा, बटाट्याचा कीस, किसलेले मक्याचे दाणे, जिरे, दाण्याचे कूट, हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर, साजूक तूप, मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून हे सगळं छान एकत्र करून घ्यावं. मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे लहान-लहान बॉल्स बनवावेत. कढईत तेल तापवून हे बॉल्स सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत. झाले की गरमागरम कॉर्न-साबुदाणा बॉल्स तयार! हे बॉल्स खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत दिले तर अगदी मस्त लागतात.
उपयोगी टिप्स:
साबुदाणा नीट २-३ तास आधी भिजवून घ्यावा, नाहीतर बॉल्स फुटू शकतात.
मिश्रण खूप सैलसर वाटलं तर थोडं शिजवलेलं शेंगदाण्याचं कूट किंवा राजगिऱ्याचं पीठ घातलं तरी बॉल्स छान बांधले जातील.
तेलात टाकण्याआधी बॉल्स हातावर थोडं तूप लावून बनवल्यास चिकटणार नाहीत.
बॉल्स मध्यम आचेवर तळावेत, नाहीतर बाहेरून पटकन ब्राऊन होऊन आतून कच्चं राहू शकतं.