दीपज्योती नमोस्तुते : दीप अमावस्येचे तेजोमय महत्त्व

आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. आजची अमावस्या ही पवित्र मानली जाते, त्याला दीप अमावस्या म्हणतात. आजच्या दिवशी दिवा जळो देवापाशी म्हणत सर्वजण देवाकडे आयुष्यात निखळ प्रकाश पडू दे म्हणून मागणं मागतात. या दिवशी कष्टकरी पोशिंद्याची शेती कामं संपून तो देवा-धर्माच्या कामाला लागतो.
दीपज्योती नमोस्तुते : दीप अमावस्येचे तेजोमय महत्त्व
Published on

आज आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. आजची अमावस्या ही पवित्र मानली जाते, त्याला दीप अमावस्या म्हणतात. आजच्या दिवशी दिवा जळो देवापाशी म्हणत सर्वजण देवाकडे आयुष्यात निखळ प्रकाश पडू दे म्हणून मागणं मागतात. या दिवशी कष्टकरी पोशिंद्याची शेती कामं संपून तो देवा-धर्माच्या कामाला लागतो. म्हणूनही हा दिवस हिंदू संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. दिव्यांची आरास आणि श्रावणाचे स्वागत यामुळे या दिवसाचा आनंद द्विगुणित होतो. अमावस्या म्हणजे नकारात्मक दिन मानतात पण दीप अमावस्या मात्र त्याला अपवाद असते. असं का? हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

दीप पूजनाचा शुद्ध सोहळा

हिंदू संस्कृतीत दिवा हा केवळ प्रकाशाचा स्रोत नसून, तो ज्ञान, आत्मशुद्धी, ईश्वराशी नाते आणि नकारात्मकतेवर मात याचे प्रतीक आहे. या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून तसेच काही ठिकाणी कणकेचे दिवे बनवून ते प्रज्वलित केले जातात. ही परंपरा अंध:कार, नकारात्मक ऊर्जा आणि अशुभ शक्तींचा नाश करते, असे मानले जाते. या दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण घरात सकारात्मक आणि प्रसन्नतेचे वातावरण तयार होते.

काही घरांमध्ये देवाला विशेष गोड नैवेद्य अर्पण केले जाते. बाजरी, गहू किंवा कणकेपासून बनवलेले खास "दिवे" खाल्लेही जातात. ज्यांचा अर्थ "प्रकाश खाणे", म्हणजेच सकारात्मक ऊर्जा आत्मसात करणे असा होतो.

पितृ तर्पण आणि देवी पूजन

हा दिवस पूर्वजांच्या स्मरणाचा देखील आहे. आजच्या दिवशी पितरांसाठी तर्पण केले जाते. म्हणजेच त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अन्न आणि पाणी अर्पण केले जाते. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि घरातील पितृदोष दूर होतो असे मानले जाते.

या दिवशी देवी लक्ष्मी आणि दुर्गेची पूजा केल्यास घरात धन, धान्याची भरभराट होते आणि संकटांपासून रक्षण मिळते, असा विश्वास आहे.

हा दिवस व्यसनांचा नव्हे तर परिश्रम, भक्ती आणि शुद्धतेचा सण आहे. या सोबतच श्रावण महिन्याला प्रारंभ होतो. त्यामुळे देवापुढे दिवे लावून आज श्रावणमासाचेही स्वागत केले जाते. अशा प्रकारे हर्ष, उल्हास, तेजोमय अशी असते ही दीप अमावस्या.

logo
marathi.freepressjournal.in