कमी पाणी पिताय? 'ही' चूक पडेल महागात; जाणून घ्या डिहायड्रेशनची लक्षणे

शरीरात पाणी कमी असल्यास तोंड कोरडे पडणे, थकवा, अशी लक्षणे दिसू शकतात. डिहायड्रेशनची सुरुवातीची चिन्हे वेळेत ओळखल्यास गंभीर आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.
कमी पाणी पिताय? 'ही' चूक पडेल महागात; जाणून घ्या डिहायड्रेशनची लक्षणे
Published on

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. शरीराला पुरेसे पाणी मिळाले नाही तर लगेचच गंभीर आजार होतील असे नाही, मात्र सुरुवातीच्या लक्षणांवर दुर्लक्ष केले तर त्याचे दुष्परिणाम हळूहळू वाढतील. अनेकांना तहान लागणे हेच पाणी कमी झाल्याचे एकमेव लक्षण वाटते, मात्र प्रत्यक्षात शरीर वेगवेगळ्या प्रकारे संकेत देत असते.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाली की, सर्वात आधी तोंड कोरडे पडू लागते. ओठ सतत कोरडे राहणे, जीभ कोरडी होणे किंवा बोलताना तोंडाला चिकटपणा जाणवणे ही डिहायड्रेशनची प्राथमिक लक्षणे मानली जातात. काहीजणांना घसा कोरडा जाणवतो आणि वारंवार पाणी प्यावेसे वाटते. त्याच वेळी लघवीचे प्रमाण कमी होणे आणि लघवीचा रंग गडद पिवळा दिसणे हेही शरीरात पाणी कमी असल्याचे महत्त्वाचे संकेत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, पाण्याच्या कमतरतेचा पचनसंस्थेवरही थेट परिणाम होतो. बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, जडपणा किंवा आम्लपित्ताचा त्रास वाढणे अशी लक्षणे दिसू शकतात. लघवी करताना जळजळ होणे किंवा वारंवार मूत्रसंस्थेचा संसर्ग होणे, यामागेही पाणी कमी पिणे हे कारण असू शकते. शरीरात पाणी कमी असल्यास पचनक्रिया मंदावते आणि त्यामुळे पोटदुखी किंवा अस्वस्थता निर्माण होते.

कमी पाणी पिताय? 'ही' चूक पडेल महागात; जाणून घ्या डिहायड्रेशनची लक्षणे
तुम्हीही चहा चुकीच्या पद्धतीने बनवताय का? 'या' चुका टाळा नाहीतर होईल आरोग्यावर परिणाम

त्वचेवरही डिहायड्रेशनचे स्पष्ट परिणाम दिसून येतात. त्वचा कोरडी पडणे, निस्तेज दिसणे, चिमटा घेतल्यावर त्वचा पूर्ववत न होणे ही लक्षणे दिसतात. काही जणांना खाज येणे किंवा त्वचा ताणल्यासारखी वाटणे असा त्रास होतो. हात आणि पाय सुरकुतल्यासारखे दिसणे हेही पाणी कमी असल्याचे लक्षण आहे. याशिवाय डोळे कोरडे होणे, डोळे जळजळणे किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे वाढणे याकडेही दुर्लक्ष करता कामा नये, असे तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, तहान लागेपर्यंत थांबण्याऐवजी दिवसभर ठराविक अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे. लघवीचा रंग, तोंड-ओठांची कोरडेपणा, त्वचेची स्थिती आणि सतत जाणवणारा थकवा या गोष्टी लक्षात ठेवल्यास शरीरात पाणी कमी पडत आहे का, हे सहज ओळखता येते. वेळीच पाण्याचे प्रमाण वाढवले तर अनेक गंभीर आरोग्य समस्या टाळता येऊ शकतात.

logo
marathi.freepressjournal.in