आजकाल आरोग्याबद्दल जागरूकता वाढत असली तरी तिची मर्यादित व्याप्ती स्पष्टपणे जाणवते. साखर जास्त असलेल्या सॉफ्ट ड्रिंकचा हानीकारक परिणाम लक्षात घेऊन अनेक ग्राहक डाएट सोडा हा चांगला पर्याय मानतात. ‘शून्य कॅलरी’, ‘शून्य साखर’ अशी आकर्षक लेबल आणि स्लिम बॉडी दाखवणाऱ्या जाहिरातींमुळे हे पेय आरोग्यस्नेही वाटते. परंतु तज्ज्ञांचा इशारा वेगळेच सत्य सांगतो.
कृत्रिम गोडवा आणि प्रिझर्व्हेटिव्ह मेंदूसाठी धोका
डाएट सोड्यात साखरेऐवजी विविध कृत्रिम स्वीटनर, फ्लेवरिंग एजंट, कॅफीन आणि रासायनिक प्रिझर्व्हेटिव्ह असतात. हे घटक शरीराला ‘कॅलरी मिळत आहेत’ असे खोटे सिग्नल देतात. या चुकीच्या सिग्नलमुळे मेंदूचा रसायनशास्त्रीय समतोल ढासळतो, आणि दीर्घकालीन नुकसानाची प्रक्रिया सुरू होते.
पोषणतज्ज्ञांच्या मते, काही कृत्रिम स्वीटनर पचनसंस्थेतील सूक्ष्मजीवांवर परिणाम करतात. हे बदल थेट मेंदू आणि हार्मोन्सपर्यंत पोहोचतात. परिणामी हार्मोनल अस्थिरता, अस्वस्थता आणि एकाग्रतेत घट यांसारख्या तक्रारी वाढू शकतात.
लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि स्मरणशक्तीवर परिणाम
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की डाएट सोड्याचे नियमित सेवन करणाऱ्या अनेकांमध्ये एकाग्रता कमी होणे, सतत थकवा जाणवणे किंवा निर्णय क्षमता मंदावणे हे परिणाम दिसून येतात. कॅफीनचा उच्च प्रमाणात असलेला डोस आणि त्यात मिसळलेले ॲडिटीव्ह मेंदूच्या पेशींवरील दाब वाढवतात.
काही अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की दीर्घकाळ अशा कृत्रिम पेयांचे सेवन केल्यास स्मरणशक्ती कमजोर होण्याची शक्यता वाढते. मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरचे नैसर्गिक प्रमाण बिघडल्याने मेंदूची प्रतिसाद क्षमता मंदावते.
शरीराला मिळणारे ‘खोटे संदेश’ धोकादायक
डाएट सोड्यातील रासायनिक घटक शरीराला चुकीची माहिती देतात - गोड चव मिळत असताना कॅलरी न मिळाल्याने शरीर गोंधळते. हा गोंधळ भूक वाढवतो, मन चंचल करतो आणि मूड स्विंग्स निर्माण करू शकतो. काही तज्ज्ञांनी याला ‘मेटाबॉलिक भ्रम’ असे नाव दिले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने डाएट सोडा टाळणे श्रेयस्कर
तज्ज्ञांचे मत एकच डाएट सोडा आरोग्यदायी पर्याय नाही. शरीराच्या हार्मोन्सपासून मेंदूच्या कार्यक्षमतेपर्यंत अनेक गोष्टींवर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नियमितपणे हे पेय घेणाऱ्यांनी याचा पुनर्विचार करावा.
पर्याय म्हणून लिंबूपाणी, नारळपाणी, घरगुती पेये, साधे पाणी, फळांचा नैसर्गिक रस (मर्यादेत) अशा नैसर्गिक पेयांचा पर्याय अधिक सुरक्षित मानला जातो.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)