

दिवाळीचा सण जवळ आला की घराघरांत फराळाची तयारी सुरू होते. चकली, चिवडा, लाडू यांसोबतच तोंड गोड करण्यासाठी वेगवेगळ्या मिठाईही बनवल्या जातात. मात्र, बाजारातून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी स्वच्छ आणि ताज्या साहित्यापासून तयार केलेले गोड पदार्थ खाणे अनेकांना आवडते. यंदाच्या दिवाळीत तुम्हालाही पाहुण्यांसाठी काहीतरी खास बनवायचे असेल, तर बेसन बर्फी हा चांगला पर्याय ठरू शकतो. बेसनाचा खमंग स्वाद, खोबऱ्याची चव आणि सुक्या मेव्याची सजावट यामुळे ही बर्फी चवीला छान लागते. विशेष म्हणजे, ही बर्फी तयार करण्यासाठी मावा किंवा मिल्क पावडरची गरज नाही. चला तर मग, जाणून घेऊया घरच्या घरी दाणेदार बेसन बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.
बेसन बर्फी बनवण्यासाठी साहित्य :
बेसनाचे पीठ - २ वाट्या
साजूक तूप - १ कप
साखर - २ कप
दूध - १ वाटी
डेसिकेटेड कोकोनट - १ वाटी
बारीक काप केलेले ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार
खाण्याचा केशरी रंग - अर्धा चमचा (ऐच्छिक)
बेसन बर्फी बनवण्याची कृती
सर्वप्रथम जाड बुडाची कढई गॅसवर ठेवा. त्यात साजूक तूप गरम करून घ्या. तूप वितळल्यानंतर त्यात बेसन घाला. मंद ते मध्यम आचेवर बेसन सतत ढवळत भाजून घ्या. बेसन कढईला लागणार नाही, याची काळजी घ्या.
बेसनाचा रंग हलका सोनेरी होऊन त्यातून खमंग सुगंध येऊ लागला की त्यात डेसिकेटेड कोकोनट घाला. हे मिश्रण आणखी एक ते दोन मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.
आता दुसऱ्या भांड्यात साखर आणि दूध एकत्र करून मंद आचेवर गरम करा. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत मिश्रण ढवळत राहा. त्याला हलकी उकळी आल्यानंतर गॅस बंद करा.
तयार झालेले दूध-साखरेचे मिश्रण भाजलेल्या बेसनात हळूहळू ओता. हे मिश्रण घालताना सतत ढवळत राहा, म्हणजे गाठी तयार होणार नाहीत. आवडीनुसार या टप्प्यावर थोडा खाण्याचा केशरी रंग घालू शकता.
मिश्रण घट्ट होऊ लागेपर्यंत मंद आचेवर ढवळत राहा. ते कढईच्या कडा सोडू लागले आणि एकत्र गोळा होऊ लागले की गॅस बंद करा.
एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून त्यात तयार मिश्रण ओता. चमच्याने किंवा वाटीच्या मदतीने मिश्रण एकसारखे पसरवून घ्या. वरून बारीक चिरलेले बदाम, काजू किंवा आवडीचे सुकेमेवे घालून हलक्या हाताने दाबा. मिश्रण पूर्णपणे थंड होऊन सेट झाल्यानंतर सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या वड्या पाडा.
अशा प्रकारे घरच्या घरी तयार होईल खमंग आणि चविष्ट बेसन बर्फी!
बेसन बर्फी बनवताना लक्षात ठेवा या टिप्स
बेसन व्यवस्थित भाजा : बेसन कच्चे राहिल्यास बर्फीला चांगली चव येत नाही. त्यामुळे मंद आचेवर सतत ढवळत ते खमंग भाजून घ्या.
गाठी होऊ देऊ नका : दूध-साखरेचे मिश्रण बेसनात घालताना सतत ढवळत राहा. यामुळे बर्फीचा पोत एकसारखा राहण्यास मदत होते.
तूप एकदम घालू नका : बेसन भाजताना तूप योग्य प्रमाणात वापरा. मिश्रण खूप कोरडे वाटल्यास थोडे तूप वाढवू शकता.
पूर्ण थंड झाल्यावरच वड्या पाडा : मिश्रण गरम असताना कापण्याचा प्रयत्न केल्यास वड्या व्यवस्थित आकारात येणार नाहीत.
साठवणूक करताना काळजी घ्या : या रेसिपीमध्ये दूध वापरले असल्यामुळे बर्फी हवाबंद डब्यात भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. खोलीच्या तापमानावर दीर्घकाळ ठेवू नका. शक्यतो काही दिवसांतच खाऊन संपवा.
टीप : बर्फीचा घट्टपणा आणि दाणेदारपणा बेसन किती भाजले आहे, तसेच मिश्रण किती घट्ट शिजवले आहे यावर अवलंबून असतो. त्यामुळे कृतीतील शेवटच्या टप्प्यावर मिश्रणाची घट्टपणा तपासणे महत्त्वाचे आहे.