Diwali Special : दिवाळीत घरात सुगंधाचा उत्सव! प्रत्येक खोलीला द्या तिच्या मूडनुसार खास 'अरोमा' टच

दिवाळी म्हटलं, की घरभर प्रकाश, सजावट आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल! पण या सणाला एक वेगळी झळाळी देता येते ती सुगंधाची.
Diwali Special : दिवाळीत घरात सुगंधाचा उत्सव! प्रत्येक खोलीला द्या तिच्या मूडनुसार खास 'अरोमा' टच
Published on

दिवाळी म्हटलं, की घरभर प्रकाश, सजावट आणि गोडधोड पदार्थांची रेलचेल! पण या सणाला एक वेगळी झळाळी देता येते ती सुगंधाची. कारण तेलकट पदार्थांचा, फटाक्यांचा वास घरातील वातावरण बिघडवते. त्यामुळे शरीरात एक वेगळ्या प्रकारचा ताण जाणवतो. त्यामुळे प्रत्येक खोलीला वेगळा, मनाला भिडणारा सुगंध दिल्यास संपूर्ण घरचं वातावरण प्रसन्न आणि सकारात्मक होतं. चला तर पाहूया, घरातील प्रत्येक भागात कोणता सुगंध योग्य आणि खास ठरू शकतो.

लिव्हिंग रूम - पाहुण्यांचं स्वागत सुगंधाने!

लिव्हिंग रूम म्हणजे घराचा आरसा! पाहुणे घरात पाऊल टाकताच पहिला प्रभाव याच खोलीतून घेतात. त्यामुळे इथे सुगंधाचा वापर अत्यंत महत्त्वाचा. ‘रिड डिफ्युजर’ हा लिव्हिंग रूमसाठी उत्तम पर्याय आहे. तो इको-फ्रेंडली, अग्निरोधक आणि मेंटेनन्स-फ्री असतो. लव्हेंडर, लेमन ग्रास, मेलॉन मस्क, सॅंडलवुड आणि ब्लॉसम यांसारखे सुगंध वातावरणात ताजेपणा आणतात.
रिड डिफ्युजर व्यतिरिक्त, सुगंधी मेणबत्त्या किंवा फ्रेगरन्स कोन्स लावल्यास खोलीला सौंदर्य आणि सुगंध दोन्ही मिळतात.

दिवाळीच्या दिव्यांसोबत हलक्या सुगंधी मेणबत्त्या ठेवण्याने लिव्हिंग रूमचं वातावरण अधिक शांत आणि स्वागतार्ह होतं.

बेडरूम - शांतता, आराम आणि प्रेमळ वातावरण

बेडरूम ही आपल्या विश्रांतीची आणि खासगी क्षणांची जागा असते. त्यामुळे इथे माइल्ड, रिलॅक्स करणारा सुगंध निवडावा. हवेत ताजेपणा आणण्यासाठी व्हेपोरायझर वापरता येतो. एका बाऊलमध्ये पाणी आणि काही थेंब सुगंधी तेल (जसे की जॅस्मिन, लिलॅक, फ्लोरल ब्लॉसम, किवा व्हॅनिला) घातल्यास अप्रतिम सौम्य सुगंध पसरतो. फळांच्या सुगंधांपैकी ब्लॅकबेरी, किवी, सायट्रस क्रीम, पीच किंवा स्ट्रॉबेरी हे फ्लेव्हरही लोकप्रिय आहेत. कपाटात पोटप्युरी सॅशे ठेवल्यास कपडे देखील नेहमी सुगंधी राहतात.

झोपेपूर्वी जॅस्मिन किंवा लॅव्हेंडरचा सुगंध मन शांत करतो आणि चांगली झोप येण्यास मदत करतो.

स्वयंपाकघर - तिखट वासावर गोड उपाय

दिवाळीत फराळाचा सुगंध घरभर दरवळत असतो, पण कधी कधी कांदा, लसूण, मासे यांसारख्या पदार्थांचा उग्र वास वातावरण खराब करू शकतो. अशा वेळी चंदन, जाई-जुई, गुलाब किंवा लिंबूगवत (लेमन ग्रास) यांसारख्या नैसर्गिक सुगंधांचे पोटप्युरी फ्रेगरन्स वापरा.
हे वास दीर्घकाळ टिकतात आणि स्वयंपाकघरातील नकोसे वास दूर करून ताजेपणा निर्माण करतात.

सुगंधामुळे केवळ वातावरण आनंदी होत नाही, तर स्वयंपाक करताना मनही प्रसन्न राहतं!

बाथरूम - छोट्या जागेतही आल्हाददायक अनुभव

दिवाळीत पाहुण्यांचे येणं-जाणं सुरू असतं, त्यामुळे बाथरूमचाही सुगंध महत्त्वाचा!
इथे सुगंधी मेणबत्त्या, फ्रेगरन्स स्टोन्स किंवा सुगंधी जेल बॉल्स वापरू शकता.
ग्रीन टी, लेमन ग्रास, मेलन मस्क अशा सुगंधांमुळे बाथरूम ताजं आणि ट्रेंडी वाटतं.
थोडे जास्त खर्च करण्याची तयारी असेल तर फ्रेगरन्स स्टोन्सचा वापर केल्याने डेकोरेशनलाही चार चाँद लागतात.

मेणबत्त्या वापरताना त्यांचा स्टँड स्थिर आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

सुगंधाचे फायदे

  • मन प्रसन्न आणि सकारात्मक ठेवतो

  • तणाव कमी करून रिलॅक्सेशन वाढवतो

  • घराचं वातावरण सणासुदीप्रमाणे आनंदी बनवतो

  • पाहुण्यांवर दीर्घकाळ टिकणारा चांगला प्रभाव टाकतो

दिवाळीचा अर्थ फक्त उजेड आणि सजावट नाही तर घरातला प्रत्येक कोपरा आनंदाने, सुगंधाने आणि ऊर्जेने उजळून निघावा हा खरा हेतू आहे. मग या दिवाळीत, प्रत्येक खोलीत एक वेगळी सुगंधकथा निर्माण करा...कारण सुगंधाने घर नाही तर मनही उजळतं!

logo
marathi.freepressjournal.in