Diwali Special : खमंग, कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवा अगदी सोप्या पद्धतीने! घरचा चिवडा राहील संपेपर्यंत ताजा

दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय सणाला रंगच येत नाही! पण चकली, लाडू, करंजी हे पदार्थ बनवताना बराच वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे अनेकजण हे पदार्थ बाहेरून आणतात. मात्र, चिवडा हा असा एक पदार्थ आहे जो पटकन, कमी वेळात आणि सहज तयार होतो. हलका, फुलका आणि कुरकुरीत असल्यामुळे चिवडा हा प्रत्येक घरातील फराळाचा अविभाज्य भाग ठरतो.
Diwali Special : खमंग, कुरकुरीत पोह्यांचा चिवडा बनवा अगदी सोप्या पद्धतीने! घरचा चिवडा राहील संपेपर्यंत ताजा
Published on

दिवाळी म्हटलं की फराळाशिवाय सणाला रंगच येत नाही! पण चकली, लाडू, करंजी हे पदार्थ बनवताना बराच वेळ आणि मेहनत लागते. त्यामुळे अनेकजण हे पदार्थ बाहेरून आणतात. मात्र, चिवडा हा असा एक पदार्थ आहे जो पटकन, कमी वेळात आणि सहज तयार होतो. हलका, फुलका आणि कुरकुरीत असल्यामुळे चिवडा हा प्रत्येक घरातील फराळाचा अविभाज्य भाग ठरतो.

मात्र, अनेकदा घरचा चिवडा काही दिवसांनी वातड होतो किंवा पोहे आकसतात. अशा वेळी थोड्या सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या, तर तुमचा चिवडा संपेपर्यंत खमंग आणि कुरकुरीत राहू शकतो.

पोह्यांचा चिवडा – साहित्य

  • अर्धा किलो पातळ पोहे

  • अर्धी वाटी चण्याची डाळ किंवा फुटाण्याची डाळ

  • एक वाटी खोबऱ्याचे काप

  • अर्धी वाटी काजू

  • तेल

  • बारीक चिरलेला लसूण

  • पिठीसाखर

  • मोहरी, हळद, मीठ

  • बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

कृती -

खुसखुशीत चिवडा तयार करण्याची सोपी पद्धत

१. सर्वप्रथम कढई गरम करा. ती थोडी तापली की पातळ पोहे टाका आणि अगदी मंद आचेवर ५-७ मिनिटे भाजा. पोहे जास्त असतील तर थोडे थोडे करून भाजा.

२. भाजलेले पोहे मोठ्या परातीत काढून ठेवा.

३. आता कढईत तेल टाका. तेल तापल्यावर प्रथम काजू तळा आणि गोल्डन रंग येताच बाजूला ठेवा.

४. त्याच तेलात खोबऱ्याचे काप मंद आचेवर खरपूस परता.

५. नंतर शेंगदाणे परतून घ्या आणि तेही काढून ठेवा.

६. उरलेल्या तेलात मोहरी टाकून फोडणी द्या. फोडणी तडतडू लागली की कढीपत्ता, हळद, लसूण आणि मिरच्या टाका.

७. लसूणाचा रंग बदलला की ही फोडणी पोह्यांवर ओता. त्यात तळलेले काजू, खोबरे आणि शेंगदाणे घाला.

९. शेवटी चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर घालून सगळं मिश्रण हलक्या हाताने मिक्स करा.

खुसखुशीत, सुगंधी आणि सुवासिक पोह्यांचा चिवडा तयार!

चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहण्यासाठी खास टिप्स

  • पोहे मऊ पडू नयेत म्हणून ते कडक उन्हात काही वेळ ठेवावेत.

  • जर घरात ऊन येत नसेल, तर मायक्रोवेव्हमध्ये किंवा कढईत थोडं परतून घ्यावं.

  • मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता हे घालण्यापूर्वी नीट पुसून कोरडे करावेत.

  • चिवडा पूर्णपणे गार झाल्यावरच डब्यात भरावा. गरम चिवडा बंद डब्यात ठेवल्यास ओलावा निर्माण होऊन कुरकुरीतपणा जातो.

  • हळद नेहमी फोडणी उतरवून शेवटी टाका, म्हणजे रंग सुंदर येतो आणि काळपट होत नाही.

दिवाळीच्या गडबडीत जर वेळ कमी असेल आणि तरीही घरचा फराळ हवा असेल, तर हा पोह्यांचा हलका आणि चविष्ट चिवडा नक्की करून बघा. थोड्या काळजीने आणि योग्य टिप्सने हा चिवडा आठवड्याभर कुरकुरीत राहील आणि पाहुण्यांनाही आवडेल!

logo
marathi.freepressjournal.in