
दिवाळी आली की गोडधोडाचा सुगंध सगळीकडे दरवळतो. फराळात चकल्या, लाडू, शेव असतातच, पण करंजीशिवाय तो अपूर्णच! काही वेळा असं होतं ना, सगळं मोजून केलं, मेहनत घेतली आणि तरीही करंजी तेलात टाकली की छप्पक! फुटली! तेल खराब, सारण बाहेर आणि सगळा मूड ऑफ. काळजी करू नका. नको! काही छोट्या पण अफलातून टिप्स फॉलो केल्यास यंदाच्या दिवाळीत तुमच्या करंज्या दिसतीलही सुंदर आणि होतीलही खुसखुशीत, चवीलाही अप्रतिम!
सारण थंड करा
सारण अजिबात गरम नसावं. गरम सारणामुळे वाफ तयार होते आणि करंजी फुटते. त्यामुळे करंजी भरण्याआधी सारण पूर्ण थंड होऊ द्या.
कडा नीट बंद करा
कडा उघड्या राहिल्या, तर सारण बाहेर येणारच. पाणी, दूध किंवा पिठाचं चिकट मिश्रण लावून कडा घट्ट बंद करा. हवे असल्यास करंजी मोल्ड वापरा, आकारही सुंदर दिसेल!
तेलाचं तापमान ठेवा मध्यम!
तेल खूप गरम असेल, तर करंजी बाहेरून लाल आणि आतून कच्ची राहते. तेल खूप थंड असेल, तर ती शिजायला वेळ घेते आणि फुटू शकते. त्यामुळे मध्यम आचच सर्वोत्तम!
एकावेळी कमी करंजी तळा!
एकदम १० करंज्या तेलात टाकल्यास तेलाचं तापमान लगेच खाली जातं आणि त्या चिकटतात. दोन-तीन करून तळा, वेळ जास्त लागेल, पण परिणाम बेस्ट येईल!
कणकेत मोहन घाला - हाच आहे गुपित घटक!
कणिक मळताना त्यात गरम तेल किंवा तुपाचं मोहन टाका. त्यामुळे कणिक मऊ राहते आणि तळताना फुटत नाही. मोहन जितकं योग्य, तितकी करंजी खुसखुशीत!
कणिक घट्ट मळा आणि झाकून ठेवा
कणिक खूप सैल असेल, तर करंजी शिजताना फाटते. मळल्यावर झाकण ठेवून ठेवा. उघडं ठेवल्यास ती सुकते आणि तळताना फाटते. कणिक झाकणाने झाकण्याऐवजी ओल्या सुती कापडाने झाका. म्हणजे त्यातील मऊपणा टिकून राहतो.
प्रमाण ठेवा अचूक
रवा आणि मैद्याचं प्रमाण नीट ठेवा. दूध टाकू नका. त्याने कणिक घट्ट होते आणि करंजी कडक बनते.
एक्स्ट्रा टिप
पिठीसाखर घरीच तयार करा. विकतची साखर काही वेळा ओलसर असते, त्यामुळे सारणात ओल राहते आणि करंजी फुटण्याची शक्यता वाढते.
या टिप्स फॉलो करा आणि यंदा करंजी करताना म्हणूच नका, "माझ्या करंज्या पुन्हा फुटल्या!" उलट सगळे म्हणतील "वाह! काय करंजी केली आहेस!"