सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा

सैंधव मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढत नाही, असा तुमचाही समज आहे का? साधे मीठ आणि सैंधव मिठातील फरक, सोडियमचे प्रमाण आणि बीपीच्या रुग्णांनी घ्यायची काळजी जाणून घ्या.
सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा
सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

उच्च रक्तदाबाचा (हाय ब्लड प्रेशर) त्रास असणाऱ्या व्यक्तींना आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अनेक जण नेहमीच्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करू लागतात. सैंधव मीठ हे साध्या मिठापेक्षा आरोग्यासाठी चांगले असून, त्यामुळे रक्तदाब वाढत नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज पूर्णपणे योग्य नाही. कारण साधे मीठ आणि सैंधव मीठ या दोन्हींमध्ये सोडियमचे प्रमाण जवळपास सारखेच असते. त्यामुळे केवळ मिठाचा प्रकार बदलल्याने रक्तदाब नियंत्रणात राहीलच असे नाही. न्यूरोलॉजिस्ट डॉ. रोहित गुप्ता यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी वाढत नाही, हा समज किती खरा?

अनेकांना वाटते की सैंधव मीठ हे साध्या मिठापेक्षा नैसर्गिक आणि आरोग्यदायी असल्याने त्याचा रक्तदाबावर परिणाम होत नाही. मात्र, डॉ. रोहित गुप्ता यांच्या माहितीनुसार, रक्तदाब वाढण्यामागे मिठातील सोडियमची महत्त्वाची भूमिका असते.

साधे मीठ असो किंवा सैंधव मीठ, दोन्हींमध्ये सोडियम असते. त्यामुळे साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरल्याने रक्तदाब वाढण्याचा धोका पूर्णपणे टळत नाही. कोणत्याही प्रकारचे मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास त्याचा रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बीपीचा त्रास असणाऱ्यांनी सैंधव मीठ सुरक्षित आहे, असा समज करून त्याचे जास्त सेवन करू नये.

सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा
थंडीच्या दिवसांत चहात तुळशीची पाने टाकताय? आधी हे वाचा! प्रत्येक तुळशीची चव नसते सारखी

जास्त मीठ खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यास शरीरात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे रक्तदाब वाढण्यास हातभार लागू शकतो. दीर्घकाळ उच्च रक्तदाब नियंत्रणात न राहिल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि किडनीच्या आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे रोजच्या जेवणात मिठाचे प्रमाण किती आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

दिवसातून किती मीठ खावे?

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रौढ व्यक्तींनी दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ खावे. हे प्रमाण साधारण एका छोट्या चमच्याइतके असते. विशेष म्हणजे, ही मर्यादा केवळ स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या मिठासाठी नसून दिवसभरात खाल्ल्या जाणाऱ्या एकूण मिठासाठी आहे. त्यामुळे जेवणाव्यतिरिक्त पॅकेज्ड पदार्थांमधून शरीरात जाणाऱ्या मिठाचे प्रमाणही लक्षात घेणे गरजेचे आहे.

बीपीचा त्रास असणाऱ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवा

  • मिठाचे प्रमाण मर्यादित ठेवा : साधे मीठ असो किंवा सैंधव मीठ, कोणत्याही प्रकारचे मीठ जास्त प्रमाणात खाणे टाळा.

  • पॅकेज्ड पदार्थ कमी खा : चिप्स, पापड, लोणचे, नमकीन यांसारख्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असू शकते.

  • बीपी नियमित तपासा : रक्तदाब नियंत्रणात आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी वेळोवेळी तपासणी करा.

  • औषधे स्वतःहून बंद करू नका : रक्तदाब नियंत्रणात आला तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करू नका.

महत्त्वाचे म्हणजे, बीपीचा त्रास असणाऱ्यांनी केवळ साध्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरण्यावर भर न देता, दिवसभरात शरीरात किती सोडियम जाते, याकडे लक्ष द्यावे.

सैंधव मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो? डॉक्टरांनी सांगितलं सत्य, मिठाबाबतचा 'हा' नियम लक्षात ठेवा
Winter Tips : थंडीचा आनंद घ्या बिनधास्त! सर्दी-खोकल्यापासून बचाव करण्यासाठी लक्षात ठेवा 'या' गोष्टी

(डिस्क्लेमर : या लेखातील माहिती सामान्य आरोग्यविषयक जागरूकतेसाठी असून, नवशक्ती यातील माहितीच्या अचूकतेची किंवा परिणामांची हमी देत नाही. उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण आणि औषधांबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणताही आहारबदल किंवा औषधांमध्ये बदल स्वतःहून करू नये.)