दिवसभर काम करताना मध्येच सारखी जांभई येतेय का? तुम्हीही "थकलो असेन बहुतेक" असं म्हणत सोडून देता का? पण वारंवार जांभई येणं हा काही वेळा थकवा नसून शरीरात सुरू असलेल्या इतर समस्यांचा संकेतही असू शकतो.
सामान्यतः, झोप अपुरी झाली, खूप ताण आला, किंवा कंटाळा वाटला की आपल्याला जांभई येते. पण जर तुम्हाला पाच मिनिटांत तीनपेक्षा जास्त वेळा जांभई येत असेल, तर हे नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखं नाही. झोपेच्या तक्रारी (जसं की स्लीप एपनिया), काही औषधं (अँटीडिप्रेसंट्स, अँटीसायकोटिक्स), मेंदूचे विकार (पार्किन्सन्स, मायग्रेन), किंवा शरीरात ऑक्सिजन कमी असणं यामुळे देखील वारंवार जांभई येऊ शकते. कधी कधी हे हृदयाच्या तक्रारीचंही लक्षण असू शकतं.
मग अशावेळी काय करावं?
थोडे छोटेसे बदल तुम्हाला खूप आराम देऊ शकतात:
दररोज रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची एक ठराविक वेळ निश्चित करा.
थंड पाणी किंवा आईस टी यांचे सेवन करा.
दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
डोक्यावर थंड पाण्याची पिशवी ठेवा.
एखादा विनोदी व्हिडिओ पाहा, कारण हसणं हा जांभई कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे!
जर हे उपाय करूनही लक्षणे कमी होत नसतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वारंवार जांभई येणं हे एक छोटंसं लक्षण वाटू शकतं, पण त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच लक्ष दिलं, तर मोठ्या अडचणी टाळता येतात आणि दिवसभर फ्रेश वाटतं, ते वेगळंच!
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)