फॅशनमध्ये रंगांना नेहमीच वेगळं स्थान असतं. अनेकदा आपण ऐकलं असेल की, कपडे निवडताना आपल्या त्वचेच्या रंगाचा विचार करावा. खरं तर योग्य रंग निवडल्याने तुमचा चेहरा अधिक ताजातवाना, उजळ आणि आकर्षक दिसू शकतो. पण हे बंधनकारक नाही. आत्मविश्वासाने परिधान केलेला कोणताही रंग तुमच्यावर खुलतोच, हेही तितकंच खरं आहे. तरीही त्वचेच्या टोननुसार कपडे घातल्यास लूक अधिक संतुलित दिसतो.
त्वचेचा रंग साधारणपणे तीन प्रकारचा असतो; वॉर्म (उबदार), कूल (थंड) आणि न्यूट्रल. तुमचा टोन ओळखण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे मनगटावरील नसा पाहणे.
जर नसा हिरव्या दिसत असतील, तर तुमचा टोन वॉर्म आहे.
नसा निळ्या किंवा जांभळ्या दिसत असतील तर तुमचा टोन कूल आहे.
नसा हिरव्या आणि निळ्या दोन्ही छटा दाखवत असतील, तर तुमचा टोन न्यूट्रल आहे.
कूल स्किन टोन असलेल्या लोकांनी निळा, गुलाबी, जांभळा, चांदी, राखाडी अशा रंगांचा विचार करावा. हे रंग चेहऱ्याला उजळपणा देतात. मात्र अतिशय चमकदार किंवा फ्लुरोसंट रंग टाळलेलेच बरे.
वॉर्म स्किन टोनसाठी ऑलिव्ह, मरून, तपकिरी, सोनेरी, पीच हे रंग उत्तम ठरतात. हे रंग त्वचेला नैसर्गिक ग्लो देतात. पण या स्कीन टोनवाल्या लोकांनी फिकट व बेरंग कपड्यांपासून मात्र दूर राहावे, कारण यामुळे लूक डल दिसू शकतो.
न्यूट्रल टोन असलेल्यांना रंगांची मर्यादा नाही. न्यूड शेड्सपासून ते ब्राइट कलरपर्यंत कुठलाही रंग त्यांच्यावर उठूनच दिसतो.
फॅशनचे नियम मार्गदर्शनासाठी असतात, पण अंतिम निर्णय नेहमी तुमचाच असावा. तुम्हाला एखादा रंग आवडतो आणि तो घातल्यावर तुम्ही छान वाटत असाल, तर तोच तुमच्यासाठी योग्य रंग आहे. कारण कपडे नव्हे तर आत्मविश्वास तुमच्या लूकला खऱ्या अर्थाने उजळतो.