FASTag New Rules : टोलनाक्यापासून २० किमी अंतरामध्ये राहता? १ नोव्हेंबरपासून १,५०० रुपयांत वर्षभराचा पास; जाणून घ्या नियम

१ नोव्हेंबरपासून पात्र वाहनचालकांना १,५०० किंवा ३,००० रुपयांत वार्षिक फास्टॅग पास मिळणार. कोणाला सवलत मिळेल आणि २० किमीची अट काय? जाणून घ्या.
FASTag New Rules : टोलनाक्यापासून २० किमी अंतरामध्ये राहता? १ नोव्हेंबरपासून १,५०० रुपयांत वर्षभराचा पास; जाणून घ्या नियम
Published on: 

मुंबई : रोज नोकरी, व्यवसाय किंवा इतर कामांसाठी घराबाहेर पडताना अनेकांना टोलनाक्यावरून प्रवास करावा लागतो. घराजवळच टोलनाका असेल आणि दिवसातून वारंवार ये-जा करावी लागत असेल, तर टोलचा खर्चही वाढतो. अशा वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या पात्र नागरिकांना आता सवलतीच्या दरात वार्षिक फास्टॅग पास मिळणार आहे. १ नोव्हेंबर २०२६ पासून अवघ्या १,५०० किंवा ३,००० रुपयांत वर्षभराचा पास घेता येणार आहे. मात्र, या योजनेचा फायदा प्रत्येक वाहनचालकाला मिळेलच असे नाही. नेमकी कोणाला सवलत मिळणार आणि त्यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेऊया.

कोणाला मिळणार नवीन फास्टॅग पास?

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी करून राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, २००८ मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावरील पात्र टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या खासगी वाहनमालकांना सवलतीच्या दरात वार्षिक स्थानिक पास घेता येणार आहे.

हा पास फक्त बिगरव्यावसायिक वापराच्या वाहनांसाठी असेल. तसेच वाहनावर वैध आणि कार्यरत फास्टॅग असणे आवश्यक आहे. पास ज्या टोलनाक्यासाठी जारी केला जाईल, त्याच टोलनाक्यावर वापरता येईल.

वर्षभराच्या पाससाठी किती पैसे मोजावे लागणार?

नवीन नियमांनुसार वार्षिक पासचे दोन दर निश्चित करण्यात आले आहेत.

  • १,५०० रुपये वार्षिक : नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या पात्र टोलनाक्यासाठी.

  • ३,००० रुपये वार्षिक : नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीत असलेल्या पात्र टोलनाक्यासाठी.

म्हणजेच, वाहनमालकाच्या घरापासून टोलनाका किती अंतरावर आहे, यावर पासचे शुल्क ठरणार नाही. संबंधित टोलनाका शहराच्या हद्दीत आहे की बाहेर, यानुसार शुल्क आकारले जाईल.

टोलनाक्यापासून २० किलोमीटरवर राहता? मग हे नियम जाणून घ्या

केवळ टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात राहत असल्यामुळे प्रत्येकाला आपोआप पास मिळणार नाही. त्यासाठी पुढील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • वाहनमालकाचे वास्तव्य संबंधित पात्र टोलनाक्यापासून २० किलोमीटरच्या परिसरात असावे.

  • वाहन खासगी आणि बिगरव्यावसायिक वापरासाठी असावे.

  • वाहनावर वैध आणि कार्यरत फास्टॅग असावा.

  • वार्षिक पास फक्त संबंधित टोलनाक्यावरच वापरता येईल.

  • प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणांनुसार टोल आकारला जाणाऱ्या बंदिस्त टोलवसुली प्रणालीतील राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती मार्गांवर ही सवलत मिळणार नाही.

  • वापरण्यायोग्य सेवा रस्ता किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असलेल्या ठिकाणीही या योजनेचा लाभ मिळणार नाही.

एक पास घेतला की सर्व टोलनाक्यांवर चालणार?

नाही. नवीन वार्षिक स्थानिक पास हा देशभरातील सर्व टोलनाक्यांवर वापरता येणारा पास नाही. उदाहरणार्थ, एखाद्या वाहनचालकाला घराजवळील पात्र टोलनाक्यासाठी वार्षिक पास मिळाला, तर त्याचा वापर त्याच टोलनाक्यावर करता येईल. प्रवासादरम्यान दुसरा टोलनाका लागल्यास तिथे या पासचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पास खरेदी करण्यापूर्वी आपण नियमित वापरत असलेला टोलनाका या योजनेत समाविष्ट आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.

मासिक पासच्या तुलनेत किती बचत होणार?

सध्या स्थानिक वाहनचालकांसाठी मासिक पासचे शुल्क ३६० रुपये आहे. त्यानुसार वर्षभरात ४,३२० रुपये खर्च होतात. नवीन योजनेत १,५०० रुपयांचा वार्षिक पास मिळाल्यास वर्षाला २,८२० रुपयांची, तर ३,००० रुपयांचा पास मिळाल्यास १,३२० रुपयांची बचत होऊ शकते. मात्र, ही तुलना सध्याच्या मासिक पासच्या शुल्काशी करण्यात आली आहे. प्रत्यक्ष बचत संबंधित टोलनाक्याचे शुल्क आणि वाहनचालकाच्या प्रवासावर अवलंबून असेल.

नवीन पास कुठे मिळणार?

नवीन नियम १ नोव्हेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. पात्र वाहनमालकांना संबंधित टोलनाक्यावर वार्षिक स्थानिक पास घेता येईल. तसेच १ डिसेंबरपासून राजमार्गयात्रा ॲपवरूनही हा पास उपलब्ध होणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, पास खरेदी करण्यापूर्वी संबंधित टोलनाका योजनेसाठी पात्र आहे का, आपले वाहन आवश्यक अटी पूर्ण करते का आणि कोणती कागदपत्रे लागतील, याची अधिकृत माध्यमातून खात्री करणे गरजेचे आहे.

महत्त्वाचे म्हणजे, ही योजना सर्व वाहनचालकांसाठी सरसकट टोलमाफी नाही. राष्ट्रीय महामार्गावरील पात्र टोलनाक्यांजवळ राहणाऱ्या खासगी वाहनमालकांनाच या सवलतीचा लाभ मिळणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in