सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट

फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट, हेवी नेकलाइनची कुर्ती, सिल्क मटेरियलवरील बुट्टीदार कुर्ती किंवा गोल्डन स्कर्ट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट
सणासुदीत पारंपरिक पेहरावाची क्रेझ; पंजाबी सूट, अनारकली अन् एथनिक गाऊन ठरतोय हिट'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

सण-उत्सवांची चाहूल लागताच खरेदीचा हंगामही सुरू होतो. रोजच्या वापरात जीन्स, स्कर्ट किंवा वेस्टर्न कपड्यांना पसंती देणाऱ्या तरुणी सण-समारंभांच्या काळात मात्र पारंपरिक पेहरावाला आवर्जून प्राधान्य देतात. यंदाच्या सणासुदीच्या मोसमात पारंपरिक पोशाखांमध्येही फॅशनचा नवा तडका पाहायला मिळत असून, अनारकली, पंजाबी सूट, पलाझो-कुर्ती, लॉन्ग कुर्ती-स्कर्ट आणि एथनिक गाऊन अशा विविध पर्यायांना पसंती मिळत आहे.

डिझायनर पंजाबी सूटचा ट्रेंड

अनारकलीप्रमाणेच पंजाबी ड्रेसमधील पटियाला फॅशनही अजूनही लोकप्रिय आहे. घेरदार पटियाला, गुडघ्यापर्यंतची कुर्ती आणि त्यावर हेवी दुपट्टा असे कॉम्बिनेशन सध्या पाहायला मिळते. महागड्या डिझायनर ड्रेसऐवजी हाफ-स्टिच डिझायनर पंजाबी सूटचे कापड घेऊन आपल्या मापानुसार ड्रेस शिवून घेण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

पंजाबी ड्रेसमध्ये यंदा ब्राइट आणि व्हायब्रंट रंगांना विशेष पसंती मिळत आहे. ऑरेंज-नेव्ही ब्लू, यलो-पिंक यांसारखी आकर्षक रंगसंगती तरुणींना भावत आहे. त्यावर मिरर किंवा कुंदन वर्क असलेला दुपट्टा घेतल्यास सणासुदीसाठी परफेक्ट पार्टी लूक तयार होतो.

पलाझोला पसंती

नेहमीच्या लेगिंग्स, सलवार आणि चुडीदारला ब्रेक देत तरुणी आता पलाझो, घागरा पॅन्ट आणि फ्लेअर्ड बॉटम्सकडे वळताना दिसत आहेत. कुर्तीवर लेगिंग्स घालण्याच्या पारंपरिक पद्धतीऐवजी सुटसुटीत पलाझोला महिलावर्ग अधिक पसंती देत आहे.

भरदार नक्षीची कुर्ती, त्यावर घेरदार पलाझो पॅन्ट आणि त्याला साजेसे दागिने किंवा फक्त उठावदार कानातले असा लूक सध्या ट्रेंडमध्ये आहे. साडी किंवा अनारकलीऐवजी पलाझो आणि जरदोजी प्रिंटच्या कुर्त्याचा फ्युजन लूकही सणासुदीत आकर्षण ठरत आहे.

एथनिक वेअरचा नवा अवतार

पारंपरिक वस्त्रांमध्ये यंदा एथनिक गाऊनची भर पडली आहे. भरगच्च कलाकुसर केलेली नेकलाइन आणि पायघोळ घेर असलेले गाऊन सण-समारंभांसाठी पसंतीचे ठरत आहेत. फ्युजन फॅशनच्या काळात गाऊन, लेगिंग्स आणि दुपट्टा असे कॉम्बो सेटही बाजारात उपलब्ध आहेत.

एथनिक गाऊन स्टाइल करताना मात्र प्रसंगानुसार लूक ठरवता येतो. गाऊनसोबत दुपट्टा घ्यायचा की केवळ गाऊनलाच स्टेटमेंट लूक द्यायचा, हे आपल्या आवडीनुसार ठरवता येते.

लाँग कुर्ती आणि स्कर्टचे कॉम्बिनेशन

तरुणींना आकर्षित करणारे लॉन्ग हाय-वेस्ट स्कर्ट आणि त्यावर कॉन्ट्रास्ट लाँग कुर्ती असे फॅशनेबल कॉम्बिनेशनही बाजारात दिसत आहे. फ्लोरल प्रिंटचा स्कर्ट, हेवी नेकलाइनची कुर्ती, सिल्क मटेरियलवरील बुट्टीदार कुर्ती किंवा गोल्डन स्कर्ट असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

या पोशाखावर हलका दुपट्टा घेतल्यास पारंपरिक आणि आधुनिक फॅशनचा सुंदर मेळ साधता येतो.

अनारकलीची फॅशन कायम

फॅशनच्या दुनियेत काही ट्रेंड असे असतात, जे वर्षानुवर्षे टिकून राहतात. अनारकली ड्रेस त्यापैकीच एक. अनारकलीची फॅशन कमी झाली असे मानले जात असले तरी बाजारातील मागणी पाहता हा पोशाख अजूनही लोकप्रिय असल्याचे दिसते.

अनारकलीचे वैशिष्ट्य म्हणजे तो विविध प्रकारच्या शरीरयष्टीला सहज शोभून दिसतो. सध्या मोठ्या घेराच्या आणि फ्लोअर-लेन्थ अनारकलीला पसंती मिळत आहे. जमिनीपर्यंत येणारा पायघोळ अनारकली सण, रिसेप्शन किंवा पार्टीसाठी आकर्षक पर्याय ठरतो.

अनारकलीवर कुंदन, जरी, रेशीम किंवा जरदोजी यांसारख्या नाजूक वर्कचा वापर करता येतो. अतिशय जड दागिन्यांऐवजी साधे पण उठावदार दागिने वापरल्यास पोशाख अधिक खुलून दिसतो. नेट, शिफॉन आणि जॉर्जेटसारख्या फॅब्रिकमध्ये मरून, नेव्ही ब्लू, गोल्डन, बेज आणि ॲक्वा ब्लू यांसारखे रंग विशेष उठून दिसतात.

सणासुदीत 'एथनिक' लूकला पसंती

सणासुदीच्या काळात प्रत्येकालाच इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते. त्यामुळे पारंपरिक पोशाखांमध्येही नवनवीन प्रयोग करण्याकडे तरुणींचा कल वाढला आहे. पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक फॅशन यांचा मेळ साधणारे एथनिक वेअर यंदाच्या सणासुदीच्या खरेदीत लक्ष वेधून घेत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in