सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम

नवरात्र, दसरा आणि दिवाळीत गोड पदार्थ खाताना वजन आणि शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञांच्या सोप्या टिप्स जाणून घ्या.
सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम
सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवरात्र, दसरा आणि त्यानंतर दिवाळी... सणांची लगबग सुरू झाली की घरात गोड पदार्थ होणारच. नैवेद्याची पुरणपोळी, श्रीखंड, शिरा असो किंवा दिवाळीतला फराळ; एरवी आहाराकडे लक्ष देणारे अनेकजण या दिवसांत थोडं जास्त गोड खातात. मात्र गोड खाल्ल्यानंतर वजन वाढेल, शुगर वाढेल अशी चिंता किंवा गिल्ट वाटू लागतो. गोड पूर्णपणे टाळण्याची गरज नाही; मात्र सणाच्या दिवशी दिवसभराचा आहार थोडा विचारपूर्वक ठेवला तर गोडाचा आस्वादही घेता येतो आणि आहाराचं संतुलनही राखता येतं. आहारतज्ज्ञ अवंती दामले यांनी यासाठी काही सोप्या गोष्टी सांगितल्या आहेत.

१. गोड खाणार असाल तर नाश्ता हलका आणि प्रथिनेयुक्त ठेवा

ज्या दिवशी घरी गोड पदार्थ होणार आहेत, त्या दिवशी सकाळच्या नाश्त्याची निवड महत्त्वाची आहे. पोहे, उपमा असे कार्बोहायड्रेट्स जास्त असलेले पदार्थ घेण्याऐवजी दही, ताक, दूध, सुकामेवा किंवा एखादं हंगामी फळ घेता येईल. ज्वारीच्या लाह्या, मुरमुरे, साळीच्या लाह्या किंवा फुटाणे दह्यात मिसळून खाल्ले तरी चांगला पर्याय ठरू शकतो. अशा प्रकारे नाश्त्यात प्रथिने आणि तंतुमय पदार्थांचा समावेश करता येतो.

सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम
जेवणानंतर गोड खाण्याऐवजी चघळा 'हा' पदार्थ; तोंडाची दुर्गंधी कमी करण्यापासून ते पचनापर्यंत मिळतील अनेक फायदे

२. ताटात फक्त गोड पदार्थ ठेवू नका

पुरणपोळी, श्रीखंड किंवा इतर गोड पदार्थ खाताना त्यासोबत भाज्या, कोशिंबीर, वरण, डाळ किंवा चटणी यांचाही समावेश करा. म्हणजे ताटात फक्त गोड किंवा मैद्याचे पदार्थ न राहता इतर पौष्टिक पदार्थांचाही समावेश होईल. गोड पदार्थ किती खायचा, याइतकंच त्यासोबत काय खायचं हेही महत्त्वाचं आहे.

३. जेवल्यानंतर लगेच आडवे होऊ नका

सणाच्या दिवशी नेहमीपेक्षा थोडं जास्त खाल्लं गेलं तरी जेवण झाल्यावर लगेच बेडवर आडवं होणं टाळा. शक्य असल्यास काही मिनिटं निवांत चालणं किंवा शतपावली करणं चांगली सवय ठरू शकते.

सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम
डाएटवाल्यांसाठी खास! नाश्त्यात बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की; १० मिनिटांत होईल तयार
सणात गोड खायचंय पण वजन वाढण्याची भीती? आहारतज्ज्ञ सांगतात हे ३ सोपे नियम
दही जास्त आंबट झालंय? फेकू नका, 'असा' करा वापर

सण म्हणजे आवडीचे पदार्थ खाण्याचाही आनंद. त्यामुळे गोड पदार्थ पूर्णपणे बंद करण्यापेक्षा प्रमाणात खाणं, दिवसभराचा आहार संतुलित ठेवणं आणि जेवल्यानंतर थोडी हालचाल करणं या साध्या गोष्टी लक्षात ठेवता येतील. मात्र मधुमेह किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असतील, तर आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य.

(टीप : ही माहिती सामान्य आहारविषयक माहितीनुसार देण्यात आली आहे. मधुमेह, वजनाशी संबंधित समस्या किंवा इतर आरोग्यविषयक त्रास असल्यास आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

logo
marathi.freepressjournal.in