...म्हणून गणेश चतुर्थी दिवशी चंद्र पाहू नये; श्री कृष्णावरही आला होता चोरीचा आळ, जाणून घ्या कारण आणि उपाय

गणेश चतुर्थी हा उत्सव आनंद, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र, या दिवशी एक विशेष परंपरा पाळली जाते, ती म्हणजे 'चंद्रदर्शन' टाळणे. या दिवशी रात्री चंद्र पाहणे अशुभ मानले जाते आणि या दिवशी चंद्राकडे नजर गेल्यास मिथ्या दोष (खोटे आरोप व अपकीर्ती) लागतो, अशी श्रद्धा आहे.
(Photo - AI)
(Photo - AI)
Published on

गणेश चतुर्थी हा उत्सव आनंद, श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. मात्र, या दिवशी एक विशेष परंपरा पाळली जाते, ती म्हणजे 'चंद्रदर्शन' टाळणे. या दिवशी रात्री चंद्र पाहणे अशुभ मानले जाते आणि या दिवशी चंद्राकडे नजर गेल्यास मिथ्या दोष (खोटे आरोप व अपकीर्ती) लागतो, अशी श्रद्धा आहे.

(Photo - AI)
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

या प्रथेचे नेमके कारण काय?

गणेश चतुर्थी दिवस शुभ असूनही चंद्रदर्शन टाळण्यास का सांगितले जाते? त्याचे कारण म्हणजे पुराणांनुसार, एकदा चंद्राने गणेशाच्या रुपाची थट्टा केली. त्यामुळे संतप्त होऊन गणेशाने त्याला शाप दिला की, “गणेश चतुर्थीच्या दिवशी जो कोणी तुला पाहील त्याला खोटे आरोप सहन करावे लागतील.” यालाच मिथ्या दोष असे म्हणतात.

श्रीकृष्णावरही झाला होता आरोप

तर या शापाप्रमाणे चक्क भगवान श्रीकृष्णावर देखील चोरीचा खोटा आळ आला होता. आख्यायिकेनुसार, श्रीकृष्णावर एकदा मौल्यवान श्यामंतक मणी चोरी केल्याचा खोटा आरोप झाला. नंतर ऋषी नारदांनी सांगितले, की गणेश चतुर्थीच्या दिवशी नकळत चंद्र पाहिल्यामुळे गणेशाचा शाप तुझ्यावर आला आहे.

या दोषातून मुक्त होण्यासाठी श्रीकृष्णाने गणेशाची उपासना केली आणि चतुर्थीचे व्रत केले. त्यानंतर शाप दूर झाला. यामुळेच गणेश चतुर्थीला चंद्र पाहणे टाळण्याची परंपरा रूढ झाली.

चंद्रदर्शन टाळण्याची वेळ

यंदा चंद्र पाहू नये असा कालावधी असा आहे -

  • २६ ऑगस्ट : दुपारी १.५४ ते रात्री ८.२९

  • २७ ऑगस्ट : सकाळी ९.२८ ते रात्री ८.५७

चुकून चंद्र दिसल्यास काय करावे?

जर या वेळेत चुकून चंद्र दिसला, तर श्यामंतक मणीची आख्यायिका स्मरण करावी किंवा त्याचा श्लोक म्हणावा.

संस्कृत श्लोक :

“सिंहः प्रसेनमवधीत्सिंहो जाम्बवता हतः।

सुकुमारक मारोदीस्तव ह्येष स्यमन्तकः॥”

याचा अर्थ : “सिंहाने प्रसेनाला मारले, जांबवानाने सिंहाला मारले. बाळा, रडू नकोस, कारण हा स्यमंतक मणी आता तुझ्याकडे सुरक्षित आहे.”

या श्लोकाच्या स्मरणाने मिथ्या दोषाचे दुष्परिणाम दूर होतात, असा विश्वास आहे.

श्रद्धेचा संदेश

गणेश चतुर्थीतील ही परंपरा भक्तांना एक वेगळा सांस्कृतिक संदेश देते, की थट्टा, उपहास आणि अहंकार टाळावा. गणपती बाप्पाच्या पूजेबरोबर संयम, श्रद्धा आणि विश्वासही तितकाच महत्त्वाचा आहे.

logo
marathi.freepressjournal.in