Ganeshotsav 2025 : सोनपावलांनी येणार गौराई; जाणून घ्या यंदाचे मुहूर्त आणि पूजा कशी करावी?

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गौरी आगमनाचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हा सण मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो.
Ganeshotsav 2025 : सोनपावलांनी येणार गौराई; जाणून घ्या यंदाचे मुहूर्त आणि पूजा कशी करावी?
Published on

गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गौरी आगमनाचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात विशेषत: कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हा सण मोठ्या भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो. भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते. गौरी एकटी येत नसून बहिणीलाही सोबत घेऊन येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी, असे त्यांचे स्वरूप मानले जाते.

गौरी ही पार्वतीचे रूप असून ती गणपतीची आई मानली जाते. काही भागांत गौरीला महालक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. म्हणूनच या दिवसांना 'महालक्ष्मी पूजन' असेही संबोधले जाते. तर, काही ठिकाणी त्या गणपतीच्या पत्नी रिद्धि-सिद्धी म्हणूनही पूजल्या जातात. माहेरवाशीण तीन दिवस गौरींचा पाहुणचार करते.

यंदाचा शुभ मुहूर्त

यंदा गौरी आवाहन रविवारी ३१ ऑगस्ट रोजी होईल. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन होईल. सकाळी ५.५९ ते संध्याकाळी ६.४३ या वेळेत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. २ सप्टेंबर रोजी गौरींचे विसर्जन केले जाईल.

Ganeshotsav 2025 : सोनपावलांनी येणार गौराई; जाणून घ्या यंदाचे मुहूर्त आणि पूजा कशी करावी?
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

परंपरा आणि पूजा पद्धत

गौरींचे आवाहन करताना घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असते तिचे पाय दुधाने धुऊन कुंकवाने स्वस्तिक काढतात. घरात प्रवेश करताना दरवाज्यापासून पूजा होणाऱ्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पावलांचे ठसे उमटवले जातात. काही ठिकाणी तेरड्याच्या रोपांना मुखवटा लावून गौरीची प्रतिमा सजवली जाते. तर, काही भागात लाकडी किंवा मातीच्या मूर्तींना साडी व दागिने नेसवून नटवले जाते.

गौरी पूजनाच्या दिवशी कोकणात ओवसा पद्धत केली जाते. सुवासिनी गौरीला वाण देतात. रात्री गौरीचे जागरण केले जाते. यावेळी झिम्मा-फुगडीच्या खेळाने वेगळीच रंगत येते.

पहिल्या दिवशी गौरींना भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी (ज्येष्ठा गौरी पूजन) पुरणपोळी, आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांचा समावेश असलेला थाटाचा जेवणाचा नैवेद्य अर्पण केला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनावेळी हळदीकुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी पाडल्या जातात. या दिवशी गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा पापड यांचा नैवेद्य केला जातो.

गौराईचे धार्मिक महत्त्व

गौरी ही समृद्धी, सौंदर्य आणि मंगलमयतेचे प्रतीक मानली जाते. भक्त मनोभावे पूजन करून देवीला साडी, दागिने, हळद-कुंकू, सुपारी आणि सुका मेवा अर्पण करतात. उत्तरपूजेत देवीला निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले जाते.

गौरींचे विसर्जन झाल्यावर पाण्यातून वाळू घरी आणून घरभर शिंपडण्याची प्रथा आहे. या वाळूमुळे घरात समृद्धी येते आणि कीटकांपासून बचाव होतो अशी श्रद्धा आहे.

म्हणूनच गणेशोत्सवातला गौरी उत्सव हा स्त्रियांसाठीचा खास सोहळा मानला जातो. नटवलेल्या गौरी, त्यांचा साजश्रृंगार आणि त्यांच्या पाहुणचारामुळे घराघरात आनंद व मंगलमय वातावरण नांदते.

logo
marathi.freepressjournal.in