
"गटारी आली रे!" म्हणत अनेकजण आपापल्या ग्रुपमध्ये प्लॅन्स आखायला लागले असतील. कुठे नॉनव्हेज पार्टी मेन्यू ठरत असेल तर कुठे कट्ट्यावरची धमाल ठरत असेल. पण गटारी अमावस्येचं नाव खरंच ‘गटारी’च आहे का? आणि ही अमावस्या म्हणजे फक्त खाण्यापिण्याचा सण आहे का? हेच आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
'गटारी'चा अर्थ काय?
बहुतेकजण गटारी अमावस्येला फक्त मजा-मस्तीचं एक निमित्त समजतात. पण गटारीचा अर्थ केवळ इतकाच आहे का? आणि 'गटारी' या शब्दाचा 'गटार' या शब्दाशी काही संबंध आहे का, याची माहिती अनेकांना नसते.
'गटारी' हा शब्द अपभ्रंशातून तयार झालेला आहे. गटारीचं मूळ नाव ‘गतहारी अमावस्या’ असं आहे. गतहार हा शब्दच मुळात गत आणि आहार या दोन शब्दांपासून बनलेला आहे. गत याचा अर्थ इथे गेलेला किंवा त्यागलेला असा घेऊन त्यागलेला आहार. हाच शब्द अपभ्रंश होऊन पुढे 'गटारी' झाला आणि पुढे पार्टींचा एक 'ट्रेंडी' सण ठरला!
यंदा कधी आहे गटारी ?
२०२५ मध्ये श्रावण २५ जुलैपासून सुरू होत आहे. त्यामुळे गटारी अमावस्या २४ जुलै रोजी साजरी होणार आहे. परंतु यंदा ही अमावस्या गुरुवारी आल्याने बहुतेक जणांनी रविवारपासूनच गटारी सेलिब्रेशन सुरू केले आहे.