

आज केस गळणे ही समस्या फक्त वयस्करांची राहिलेली नाही. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सगळ्यांनाच केस तुटणे, फाटे फुटणे, केस पातळ होणे, कोंडा आणि अकाली टक्कल अशा तक्रारी सतावत आहेत. यावर उपाय म्हणून आपण महागडे शाम्पू, सीरम, हेअर मास्क वापरतो. काही वेळा परिणाम दिसतो, पण अनेकदा पैसे खर्च करूनही केसांची स्थिती तशीच राहते.
यावर सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर एक अगदी सोपा, देशी आणि स्वस्त उपाय सांगते. तिच्या मते, केसांची खरी काळजी ही बाहेरून नाही, तर आतून - म्हणजे आहारातून घेतली पाहिजे. आणि केसांसाठी आहारात असायलाच हवी अशी एक पालेभाजी म्हणजे शेपू.
ऋजुता दिवेकर नेहमीच पारंपरिक भारतीय आहारावर भर देते. तिच्या म्हणण्यानुसार, आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी शेपूची भाजी केसांच्या आरोग्यासाठी एखाद्या ‘सुपरफूड’पेक्षा कमी नाही.
केसांसाठी शेपू का इतकी फायदेशीर आहे?
ऋजुता दिवेकर सांगते की, भारतात पूर्वापार बाळंतपणानंतर दिल्या जाणाऱ्या आहारात शेपूचा समावेश आवर्जून केला जातो. कारण ही भाजी शरीराला ताकद देते, झोप सुधारते आणि केस गळती कमी करण्यास मदत करते. शेपूतील पोषक घटक थेट स्काल्पपर्यंत पोहोचतात आणि केसांची मुळे आतून मजबूत करतात.
हिवाळ्यात सहज मिळणारी शेपू ही लोहाचा उत्तम स्रोत आहे. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळतं आणि केसांची नैसर्गिक वाढ सुधारते.
केसांच्या आरोग्यासाठी शेपूचे जबरदस्त फायदे -
१) प्रोटीनचा नैसर्गिक स्रोत
शेपूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. केसांची मुळे म्हणजेच हेअर फॉलिकल्स मजबूत होण्यासाठी प्रोटीन अत्यंत गरजेचं असतं. शेपू नियमित खाल्ल्याने केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं आणि केस जाड व मजबूत होतात.
२) व्हिटॅमिन 'ई' आणि अँटीऑक्सिडंट्स
शेपूमध्ये व्हिटॅमिन 'ई' आणि विविध फायटोकेमिकल्स असतात. हे घटक स्काल्पचं आरोग्य सुधारतात आणि केसांच्या मुळांना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात. त्यामुळे केस गळती कमी होते आणि केसांची वाढ चांगली होते.
३) ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स
शेपूमधील ओमेगा फॅटी ॲसिड्स स्काल्पला हायड्रेट ठेवतात. त्यामुळे केसांचा कोरडेपणा कमी होतो, केस मऊ राहतात आणि लवचिकता वाढते. यामुळे केस लवकर तुटत नाहीत आणि चमकदार दिसतात.
४) लेसिथिनचा फायदा
शेपूमध्ये असलेलं लेसिथिन केसांची रचना सुधारायला मदत करतं. केस मुळापासून मजबूत होतात, स्काल्प हेल्दी राहतो आणि केसांना नैसर्गिक चमक येते.
५) व्हिटॅमिन ‘सी’ आणि बी-१२
शेपूमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ आणि बी-१२ भरपूर प्रमाणात असतं. हे घटक केसांची वाढ वाढवण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि केस अकाली पांढरे होण्याचा धोका कमी करण्यास मदत करतात.
शेपू आहारात कशी घ्यावी?
ऋजुता दिवेकर सांगते की शेपू खाण्यासाठी फार क्लिष्ट कृती करायची गरज नाही. साधी शेपूची भाजी, शेपूची आमटी, डाळीत घातलेली शेपू, पराठा, थेपला किंवा भजी अशा कोणत्याही स्वरूपात शेपू नियमित आहारात घेतली तरी केसांना त्याचा फायदा होतो.
महागड्या हेअर ट्रीटमेंट्सपेक्षा, जर तुम्हाला खरंच केस मजबूत, दाट आणि चमकदार हवे असतील, तर आहारात शेपूचा समावेश करून बघा. कारण ऋजुता दिवेकर म्हणते तसं खरी सौंदर्याची सुरुवात ही स्वयंपाकघरातूनच होते.