Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा

स्वयंपाकघरातील धूर, लाकूड-कोळशाचा वापर आणि अपुरे वायुवीजन यामुळे फुफ्फुसांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. COPD आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय जाणून घ्या.
Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

स्वयंपाकघरात रोज पोळ्या भाजणे, फोडणी देणे, तेलात पदार्थ तळणे या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. मात्र, स्वयंपाक करताना निर्माण होणारा धूर आणि घरातील हवेची खराब गुणवत्ता फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. विशेषतः स्वयंपाकघरात पुरेसे वायुवीजन नसल्यास किंवा लाकूड, कोळसा, शेणाच्या गोवऱ्यांसारख्या इंधनांचा वापर होत असल्यास आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ अशा प्रदूषित हवेच्या संपर्कात राहिल्याने COPD आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. त्यामुळे केवळ बाहेरील प्रदूषणच नव्हे, तर घरातील हवेच्या गुणवत्तेकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत कॅन्सर फिजिशियन डॉ. अश्विन राजभोज यांनी व्यक्त केले आहे.

लाकूड आणि कोळशाच्या धुरामुळे फुफ्फुसांना धोका

भारतातील अनेक घरांमध्ये आजही स्वयंपाकासाठी लाकूड, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या आणि पिकांचे अवशेष यांचा वापर केला जातो. ही इंधने जळताना हवेत अतिशय सूक्ष्म धूलिकण, कार्बन मोनॉक्साइड आणि इतर हानिकारक घटक मिसळतात. श्वासावाटे हे कण फुफ्फुसांमध्ये पोहोचतात. त्यामुळे श्वसनमार्गाला जळजळ होऊ शकते आणि दीर्घकाळ संपर्क राहिल्यास फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

विशेष म्हणजे, काही घरांमध्ये LPG गॅस उपलब्ध असूनही विशिष्ट पदार्थ बनवण्यासाठी किंवा सण-समारंभांच्या वेळी लाकूड आणि कोळशाचा वापर केला जातो. स्वच्छ इंधन उपलब्ध असतानाही पारंपरिक इंधनांचा वापर सुरू ठेवण्याच्या या पद्धतीला 'फ्युएल स्टॅकिंग' असे म्हणतात. यामुळे घरातील सदस्यांना धुराचा संपर्क येत राहतो.

Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Old Bedsheet Hacks : जुने बेडशीट्स फेकू नका! घरातील 'या' कामांसाठी होईल भन्नाट उपयोग

स्वयंपाकघरात हवा खेळती नसल्यास वाढतो त्रास

स्वयंपाकघरात खिडक्या, चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅनची योग्य व्यवस्था नसेल, तर स्वयंपाकातून निर्माण होणारा धूर आणि प्रदूषित कण घरातच साचतात. अशा हवेचा सतत संपर्क आल्याने खोकला, श्वास घेण्यास त्रास आणि श्वसनमार्गाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

घरात स्वयंपाकासाठी अधिक वेळ घालवणाऱ्या महिला आणि स्वयंपाकघरात असणाऱ्या लहान मुलांना अशा प्रदूषणाचा अधिक संपर्क येण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाकघरात पुरेसे वायुवीजन असणे महत्त्वाचे आहे.

अतिउष्ण तेल आणि फोडणीच्या धुराकडेही दुर्लक्ष नको

स्वयंपाक करताना तेल खूप गरम करणे, तेलातून धूर निघेपर्यंत ते तापवणे, वारंवार वापरलेले तेल वापरणे किंवा सतत डीप फ्राय करणे अशा सवयींमुळे हवेत सूक्ष्म कण आणि त्रासदायक धूर निर्माण होऊ शकतो. यामुळे घरातील हवेची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते.

Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
रात्री उकाड्यामुळे झोप लागत नाही? शांत झोपेसाठी करा 'या' सोप्या गोष्टी

विशेषतः आधीपासून फुफ्फुसांचे आजार असलेल्या व्यक्तींना अशा धुरामुळे खोकला, घरघर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. मात्र, अशा स्वयंपाकाच्या पद्धतींना थेट फुफ्फुसांच्या कर्करोगाचे सिद्ध कारण मानता येत नाही. तरीही स्वयंपाक करताना धूर कमी निर्माण होईल, याची काळजी घेणे आवश्यक आहे.

नैसर्गिक इंधनाचा धूरही सुरक्षित नाही

लाकूड आणि शेणाच्या गोवऱ्या हे नैसर्गिक पदार्थ असल्याने त्यांचा धूर आरोग्यासाठी सुरक्षित असतो, असा अनेकांचा समज आहे. मात्र, नैसर्गिक इंधन जळतानाही हानिकारक प्रदूषक हवेत मिसळतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) ने कोळसा जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या घरातील वायुप्रदूषणाचे वर्गीकरण मानवासाठी कर्करोगकारक असे केले आहे. तसेच बायोमास इंधन जाळल्यामुळे होणाऱ्या उत्सर्जनाचे संभाव्य कर्करोगकारक असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Skin Care Tips : मुरुमांपासून पिगमेंटेशनपर्यंत, त्वचेची काळजी घेताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञ सांगतात...

COPD आणि फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका किती?

COPD म्हणजेच क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज हा फुफ्फुसांचा दीर्घकालीन आजार आहे. या आजारात श्वसनमार्ग अरुंद होतात आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे सतत खोकला येणे, कफ होणे आणि थोडे चालल्यानंतरही दम लागणे अशी लक्षणे दिसू शकतात. घरगुती वायुप्रदूषण हा COPD च्या जोखमीच्या घटकांपैकी एक आहे.

याशिवाय, लाकूड, कोळसा यांसारखी घन इंधने जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषित हवेच्या दीर्घकाळ संपर्काचा फुफ्फुसांच्या कर्करोगाशीही संबंध आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अंदाजानुसार, २०२१ मध्ये जगभरात घरगुती वायुप्रदूषणामुळे सुमारे २९ लाख अकाली मृत्यू झाले. त्यामुळे घरातील हवेची गुणवत्ता सुधारणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Health Tips : पोळ्या भाजताना, फोडणी देताना सावधान! स्वयंपाकघरातील धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
Health Tips : रोज पुरेशी झोप घेत नाही? शरीरावर होतात 'हे' गंभीर परिणाम; तज्ज्ञ सांगतात...

स्वयंपाकघरातील प्रदूषण कमी करण्यासाठी काय कराल?

घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे बदल करता येतात.

  • लाकूड, कोळसा आणि शेणाच्या गोवऱ्यांऐवजी LPG, वीज किंवा बायोगॅससारख्या स्वच्छ इंधनांचा वापर करा.

  • पारंपरिक घन इंधनांचा वापर शक्यतो पूर्णपणे टाळा.

  • स्वयंपाकघरात योग्य क्षमतेची चिमणी किंवा एक्झॉस्ट फॅन बसवा.

  • स्वयंपाक करताना खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून धूर बाहेर जाईल.

  • तेल अतिउष्ण होईपर्यंत गरम करू नका.

  • वारंवार वापरलेले तेल टाळा.

  • स्वयंपाकघरातील धूर घराच्या इतर भागांत पसरणार नाही, याची काळजी घ्या.

केवळ घरात LPG गॅस कनेक्शन असणे पुरेसे नाही. त्यासोबत लाकूड किंवा कोळशाचा वापर सुरू असल्यास घरातील प्रदूषणाचा धोका कायम राहू शकतो.

सतत खोकला किंवा दम लागत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

सतत खोकला येणे, श्वास घेताना घरघर होणे, दम लागणे, वारंवार श्वसनाचे संसर्ग होणे किंवा विनाकारण वजन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

बाहेरील वायुप्रदूषणाप्रमाणेच घरातील हवेची गुणवत्ता देखील फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन वापरणे, स्वयंपाकघरात योग्य वायुवीजन ठेवणे आणि धूर निर्माण करणाऱ्या सवयी कमी करणे या छोट्या बदलांमुळे घरातील प्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे निरोगी फुफ्फुसांसाठी स्वयंपाकघरातील हवेची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)