

दिवसभराचा थकवा, सततची धावपळ आणि अनियमित खाण्यापिण्यामुळे शरीर पटकन थकून जातं. अशावेळी शरीराला ताकद देणारं आणि आरोग्य टिकवणारं एखादं नैसर्गिक पेय रोजच्या आहारात असणं गरजेचं ठरतं. अशाच हेल्दी पर्यायांमध्ये बदाम दूध सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे. अनेक सेलिब्रिटींपासून फिटनेस प्रेमींपर्यंत अनेक जण नियमित बदाम दूध पिण्याला प्राधान्य देतात. चविष्ट, हलकं आणि पोषणमूल्यांनी भरलेलं हे दूध शरीराला आतून ऊर्जा देण्यास मदत करतं.
बदामामध्ये प्रथिने, व्हिटामिन ई, कॅल्शियम, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हे दूध केवळ चवीसाठी नाही, तर शरीराच्या एकूण आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. विशेषतः अभ्यास करणारी मुलं, सतत मानसिक ताणात काम करणारे लोक आणि फिटनेसकडे लक्ष देणाऱ्यांसाठी हे पेय उपयुक्त ठरू शकतं.
घरच्या घरी बदाम दूध कसं तयार कराल?
सर्वात आधी १० ते १२ बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांची सालं काढून घ्या. हे बदाम मिक्सरमध्ये टाकून त्यात दोन कप कोमट दूध घाला. चवीनुसार खजूर, मध किंवा थोडी साखर घालू शकता. अधिक चव आणि सुगंधासाठी वेलची पूड किंवा केशरही घालता येईल.
हे मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. तयार झालेलं बदाम दूध गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे पिता येतं. काही जण पाण्यासोबत बदाम ब्लेंड करून गाळूनही हे दूध तयार करतात.
बदाम दूध पिण्याचे फायदे
शरीराला झटपट ऊर्जा मिळण्यास मदत होते
दिवसभर थकवा कमी जाणवतो
स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते
त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते
कॅल्शियममुळे हाडं आणि दात मजबूत राहण्यास मदत होते
पचन हलकं आणि सुरळीत राहण्यास मदत होते
हेल्दी फॅट्समुळे हृदयासाठीही फायदेशीर मानलं जातं
कोणासाठी जास्त फायदेशीर?
लहान मुलं, अभ्यास करणारे विद्यार्थी, ऑफिसमध्ये तासन्तास काम करणारे लोक आणि व्यायाम करणाऱ्यांसाठी बदाम दूध उत्तम पर्याय ठरू शकतं. सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे दूध घेतल्यास शरीर रिलॅक्स वाटण्यास मदत होते.
एकंदरीत, चव आणि आरोग्याचा उत्तम समतोल साधणारं बदाम दूध हे रोजच्या आहारातील एक हेल्दी आणि सोपा पर्याय ठरू शकतो.