

हवामानातील बदल, कमी पाणी पिणे किंवा सतत लिपस्टिकचा वापर यामुळे अनेकांच्या ओठांचा नैसर्गिक गुलाबीपणा कमी होतो आणि ओठ कोरडे पडू लागतात. अशावेळी बाजारातील महागडे लिपबाम वापरण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला नैसर्गिक लिपबाम हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
गुलाबाच्या पाकळ्या, मध, व्हिटॅमिन ई आणि काही घरगुती घटकांच्या मदतीने तयार होणारा हा लिपबाम ओठांना आवश्यक मॉइश्चर देण्यास मदत करतो. नियमित वापर केल्यास ओठ मऊ राहण्यासोबतच त्यांचा नैसर्गिक रंगही खुलण्यास मदत होऊ शकते.
गुलाबाच्या पाकळ्यांचा लिपबाम का वापरावा?
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये त्वचेला पोषण देणारे नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यासोबत मध, व्हिटॅमिन ई आणि खोबरेल किंवा बदामाचे तेल वापरल्याने ओठांवरील कोरडेपणा कमी होण्यास मदत मिळते. हा लिपबाम रसायनमुक्त असल्यामुळे दैनंदिन वापरासाठीही योग्य पर्याय ठरू शकतो.
साहित्य
१ ते १½ वाटी गावठी गुलाबाच्या पाकळ्या
२ ते ३ टेबलस्पून खोबरेल तेल किंवा बदामाचे तेल
१ व्हिटॅमिन ई कॅप्सूल
१ टीस्पून मध
१ टीस्पून व्हॅसलिन
कृती
सर्वप्रथम गावठी गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्या पंख्याखाली किंवा सौम्य उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या.
वाळलेल्या पाकळ्या हलक्या हाताने ठेचून त्यात खोबरेल किंवा बदामाचे तेल मिसळा. हे मिश्रण काचेच्या भांड्यात घेऊन डबल बॉयलर पद्धतीने गरम करा, जेणेकरून गुलाबाचा अर्क तेलात चांगला उतरू शकेल.
यानंतर मिश्रण गाळून त्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील तेल, मध आणि व्हॅसलिन घाला. सर्व साहित्य ७ ते ९ मिनिटे नीट ढवळा. मिश्रणाला क्रीमी टेक्स्चर आल्यानंतर ते स्वच्छ डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवा.
सुमारे ३० मिनिटांनंतर लिपबाम वापरण्यास तयार होईल.
लक्षात ठेवा...
तयार लिपबाम नेहमी फ्रिजमध्येच ठेवा.
साधारण १० ते १५ दिवस तो वापरता येतो.
वापरताना स्वच्छ बोट किंवा स्पॅचुलाचा वापर करा, त्यामुळे लिपबाम अधिक काळ टिकण्यास मदत होते.
(टीप - हा उपाय घरगुती त्वचा निगा राखण्यासाठी आहे. एखाद्या घटकाची ॲलर्जी असल्यास वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा किंवा त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.)