Health Care: श्रावण सुरु झाला असला तरी पाऊस जोरदार सुरु आहे. अनेक भागात अजूनही जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचत आहे, वातावरण थंड आहे. अशात अनेक मोसमी आजार डोकं वर काढतात. सर्दी आणि तापसारख्या आजारांचे प्रमाण पावसाळ्यामध्ये वाढते. यापासून स्वतःला वाचवून हेल्दी राहणे गरजेचे आहे. यासाठी नवी मुंबई येथील मोरलवार चाइल्ड केअर हॉस्पिटलचे कन्सल्टन्ट पीडिअॅट्रिशियन डॉ. सदानंद शेट्ये आणि अबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डिरेक्टर डॉ. जेजो करनकुमार यांच्याकडून जाणून घेऊयात पावसाळ्यात स्वतःची काळजी नक्की कशी घ्यायची. आपल्या आरोग्याचे हवामानापासून रक्षण करण्यासाठी आणि पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी मोसमी आजारांना दूर ठेवण्यासाठी खाली दिलेल्या टिप्स फॉलो करा.
योग्य प्रकारे स्वच्छता राखा
आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपले घर निर्जंतुक करा, साचलेल्या पाण्याचा निचरा करा, पाणी वाहून जाण्याची यंत्रणा नीट कार्यरत असेल याची खबरदारी घ्या आणि डासांसाठीचे रिपेलन्ट वापरा. आपले हात, विशेषत: जेवणापूर्वी साबणाने नियमितपणे धुवा, आपली त्वचा कोरडी ठेवा, मोकळे हवेशीर कपडे घाला आणि आपली नखे कापून स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्या.
समतोल आहार घ्या
चांगले आरोग्य व प्रतिकारशक्तीसाठी शरीराला पुरेसे पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. कितीही मोह झाला तरीही रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा व त्याऐवजी घरामध्ये शिजविलेले ताजे अन्न खा म्हणजे जंतूसंसर्गाचा धोका कमी होईल. शक्यतो उकळलेले आणि गाळलेले पाणी पिऊन शरीराची आर्द्रतेची पातळी टिकविणे महत्त्वाचे आहे. योग्य प्रकारची उदाहरणार्थ व्हीटॅमिन सी सारखी जीवनसत्वे रोगप्रतिकारशक्ती बळकट बनविण्यासाठी अत्यावश्यक व संसर्गापासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची असलेली जीवनसत्वे आहारात समाविष्ट करणे ही स्वास्थ्य जपण्याची गुरुकिल्ली आहे. , संत्री, लिंबू, कॉलिफ्लॉवर, ढोबळी मिरची, ब्रोकोली इत्यादींमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. काहीवेळा संसर्गामधून लवकर बरे होण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला व्हिटॅमिन सीच्या अतिरिक्त सप्लिमेन्ट्सही देऊ शकतात.
सक्रिय रहा
पावसामुळे तुमच्या दैनंदिन वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो, तरीही व्यायामातील सातत्य टिकवा आणि बाहेर जाण्याऐवजी घरच्याघरीच योगा किंवा व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही आपले शरीर तंदुरुस्त राखू शकाल, आपले स्नायू आणि हाडे बळकट करू शकाल व अधिक चांगल्या दर्जाची झोप तुम्हाला मिळू शकेल जे तुमच्या रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना करा
इन्फ्लुएन्झासारख्या आजारांपासून स्वत:ला वाचविण्यासाठी आणि समाजालाही संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. पावसाळा सुरू होण्याआधी फ्लूचे इंजेक्शन घेतल्याने अशा आजांपासून व त्यातून उद्भवणाऱ्या गुंतागुंतींपासून सुरक्षित राहण्यास मदत होईल. लसीकरणाविषयी आणि फ्लूचे अधिक चांगले व्यवस्थापन कसे करावे याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.