

शाळेनंतर ऑफिस लाईफ सुरू होताच अनेकांना ज्या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो, ती म्हणजे इलॅस्टिक टाय सोडून खरी टाय नीट बांधण्याची कसरत. ऑफिस किंवा पार्टीला जायच्या आधी टायची गाठ नीट बसवताना अनेकांची चांगलीच धांदल उडते. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ही अडचण आता अवघ्या काही सेकंदांत सुटताना दिसत आहे.
‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर @TodayiLearrned या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या १० ते १२ सेकंदांच्या या क्लिपमध्ये टाय बांधण्याची एक भन्नाट आणि नेहमीच्या पद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी ट्रिक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स "हे आधी का माहित नव्हतं?" अशा प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
काय आहे ही सोपी टाय बांधण्याची ट्रिक?
व्हायरल व्हिडीओनुसार, टायचा रुंद भाग डाव्या हाताच्या तळहातावर ठेवायचा. त्यानंतर तो सलग तीन वेळा गोलाकार गुंडाळायचा. हातावर तयार झालेल्या या वळणांपैकी मधला भाग पकडून वरच्या दिशेने ओढला की क्षणार्धात एक परफेक्ट टाय नॉट तयार होते. विशेष म्हणजे, फक्त तीन मूव्ह्समध्ये आणि अवघ्या १० सेकंदांत हे काम पूर्ण होतं.
युजर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडीओ व्हायरल होताच कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला आहे. एका युजरने लिहिलं, "मी आजवर टाय बांधणं जगातलं सर्वात कठीण काम समजत होतो, पण हा तर लहान मुलांचा खेळ निघाला." दुसऱ्याने म्हटलं, "हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता मी स्वतःला टाय बांधण्यात प्रो समजतो." तर आणखी एका युजरने गंमतीने प्रतिक्रिया दिली, "ही ट्रिक शाळेतच शिकवायला हवी होती."
साधारणपणे जिथे टाय बांधायला दोन ते तीन मिनिटे लागतात, तिथे या सोप्या हॅकमुळे काही सेकंदांतच परफेक्ट लुक मिळतो. त्यामुळेच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत असून, अनेकांच्या सकाळच्या धावपळीत तो खऱ्या अर्थाने उपयोगी ठरत आहे.