

पारंपरिक इडलीला फ्युजन ट्विस्ट देत ट्राय करा ही भन्नाट रेसिपी ‘इडली पिझ्झा’. दक्षिण भारतीय स्वाद आणि इटालियन टचचा परिपूर्ण मिलाफ असलेली ही रेसिपी नक्कीच तुमच्या नाश्ता किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पसंतीस उतरेल.
साहित्य
इडलीसाठी साहित्य :
१ कप रवा (सूजी)
१/२ कप दही
चवीनुसार मीठ
१ छोटं पाकीट फ्रूट सॉल्ट
सजावटीसाठी साहित्य :
१ मोठा कांदा बारीक चिरलेला
१ मूठ सिमला मिरची बारीक चिरलेली
१/२ कप गाजर किसलेलं
ऑलिव्ह किंवा टोमॅटोचे छोटे तुकडे
२ चमचे टोमॅटो केचप
२ छोटे चमचे चीज किसलेलं
१/२ चमचा लाल तिखट पावडर
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यात रवा, दही आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिसळा. थोडं पाणी घालून घट्ट पण गुळगुळीत पेस्ट तयार करा आणि हे मिश्रण सुमारे दहा मिनिटं झाकून ठेवा. नंतर त्यात फ्रूट सॉल्ट घालून हलकं ढवळा. इडलीच्या साच्यांना थोडं तेल लावून हे मिश्रण घाला आणि वाफवून घ्या. इडल्या शिजल्यावर त्या प्लेटमध्ये काढा.
त्यानंतर प्रत्येक इडलीवर टोमॅटो केचपचा हलका थर लावा. त्यावर बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, गाजर आणि टोमॅटोचे तुकडे पसरवा. वरून चीज आणि लाल तिखट शिंपडा. आता या इडल्या पॅनवर झाकण ठेवून काही मिनिटं शेकून घ्या, जोपर्यंत चीज वितळत नाही. तयार झालेला गरमागरम ‘इडली पिझ्झा’ सॉसबरोबर सर्व्ह करा आणि या स्वादिष्ट फ्युजन डिशचा आनंद घ्या.