

सकाळच्या नाश्त्यात रोज तेच पोहे, उपमा किंवा इडली खाऊन अनेकांना कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी झटपट, पोटभर आणि चविष्ट खावंसं वाटतं. पण धावपळीच्या जीवनात थालीपीठासाठी वेगळी भाजणी तयार करणं प्रत्येकवेळी शक्य होत नाही.
मात्र घरात उपलब्ध असलेल्या साध्या पिठांपासूनही अगदी कमी वेळात कुरकुरीत कांद्याचं थालीपीठ तयार करता येऊ शकतं. गरमागरम थालीपीठ, त्यासोबत लोणी, दही किंवा हिरवी मिरचीचं लोणचं मिळालं की नाश्त्याची मजाच काही वेगळी असते.
साहित्य -
२ मोठे कांदे
१ वाटी गव्हाचं पीठ
अर्धी वाटी ज्वारीचं पीठ
अर्धी वाटी बेसन
२ चमचे तांदळाचं पीठ
हिरवी मिरची-लसूण पेस्ट
हळद
लाल तिखट
धणेपूड
मीठ
पांढरे तीळ
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
कृती -
सर्वप्रथम कांदा बारीक किंवा पातळ चिरून घ्या. त्यात मीठ घालून काही मिनिटं बाजूला ठेवा. कांद्याला पाणी सुटल्यावर त्यात गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बेसन आणि तांदळाचं पीठ मिसळा.
यानंतर हिरवी मिरची-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणेपूड, कोथिंबीर आणि तीळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या. कांद्याच्या पाण्यातच पीठ भिजत असेल तर वेगळं पाणी घालण्याची गरज नाही.
तवा गरम करून घ्या. ओल्या कापडावर किंवा प्लास्टिक शीटवर थोडं तेल लावून त्यावर थालीपीठ थापा. मधोमध लहान छिद्र करा आणि गरम तव्यावर भाजण्यासाठी टाका.
दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
थालीपीठ अधिक चविष्ट करण्यासाठी टिप्स
थोडंसं दही घातल्यास थालीपीठ अधिक मऊ होतं
जाडसर चिरलेला कांदा वापरल्यास कुरकुरीत टेक्स्चर मिळतं
वरून लोणी किंवा तूप घालून सर्व्ह केल्यास चव वाढते
हे इन्स्टंट कांद्याचं थालीपीठ कमी वेळात तयार होतं आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे ऑफिस, शाळा किंवा प्रवासासाठीही हा उत्तम नाश्त्याचा पर्याय ठरू शकतो.