

कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात अपूर्ण वाटते? मग आजचा दिवस कॉफीप्रेमींसाठी खास आहे. दरवर्षी १ ऑक्टोबरला International Coffee Day साजरा केला जातो. जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेयांपैकी एक असलेल्या कॉफीचा आनंद घेण्यासोबतच या दिवसाच्या माध्यमातून कॉफी उत्पादक शेतकरी, कामगार आणि या उद्योगाशी जोडलेल्या समुदायांच्या योगदानाचीही दखल घेतली जाते.
यंदाची थीम Coffee is Part of the Solution अशी असून, कॉफी उद्योगासमोरील शाश्वतता आणि हवामान बदलाच्या आव्हानांवरही यात भर देण्यात आला आहे.
पारंपरिक गरम कॉफीची चव कायमच लोकप्रिय असली, तरी सध्या तरुणांमध्ये कॉफीचे वेगवेगळे फ्लेवर्स आणि कॅफे-स्टाइल कॉम्बिनेशन्सचा ट्रेंड पाहायला मिळतो. त्यामुळे कॅफेत जाण्याची गरज नाही. घरच्या घरी काही सोप्या पद्धतींनी कॉफीला हटके ट्विस्ट देता येतो. जाणून घेऊया अशाच काही कॉफी रेसिपी...
Iced Vanilla Brown Sugar Latte
नेहमीच्या लॅटेला गोड ट्विस्ट द्यायचा असेल तर हा पर्याय करून पाहा. एस्प्रेसोमध्ये ब्राउन शुगर आणि थोडे व्हॅनिला सिरप मिसळा. त्यानंतर बर्फ आणि थंड दूध घालून हे मिश्रण तयार करा. वरून थोडी दालचिनी भुरभुरल्यास कॅफे-स्टाइल लॅटे तयार.
Coconut Cold Brew
कॉफीला काहीतरी रिफ्रेशिंग ट्विस्ट हवा असेल तर कोकोनट कोल्ड ब्रू हा पर्याय उत्तम. कोल्ड ब्रू कॉफीमध्ये थंड नारळपाणी आणि थोडे नारळाचे दूध मिसळा. बर्फ घालून सर्व मिश्रण नीट ढवळा. कॉफीची स्ट्राँग चव आणि नारळाची फ्रेशनेस यामुळे वेगळीच चव मिळते.
Espresso Orange Tonic
कॉफी आणि ऑरेंजचा कॉम्बिनेशन ऐकायला वेगळा वाटत असला, तरी तो नक्कीच ट्राय करता येतो. ग्लासमध्ये बर्फ, थंड टॉनिक वॉटर आणि थोडा ताजा संत्र्याचा रस घाला. त्यावर हळूहळू एस्प्रेसो ओता. वरून संत्र्याची फोड लावून ही फिजी कॉफी सर्व्ह करा.
Mocha Banana Coffee Smoothie
सकाळची कॉफी आणि हलका नाश्ता एकाच ड्रिंकमध्ये हवा असेल तर मोका बनाना कॉफी स्मूदी करून पाहा. थंड कॉफी, पिकलेले केळे, दूध, कोको पावडर आणि बर्फ ब्लेंड करा. गोड चव हवी असल्यास थोडे मध घालू शकता. क्रीमी आणि चॉकलेटी चवीचा हा स्मूदी व्यस्त सकाळीसाठी झटपट पर्याय ठरू शकतो.
Cinnamon Honey Whipped Coffee
कॉफीला फ्रोथी आणि आकर्षक बनवायचे असेल तर व्हिप्ड कॉफीचा पर्याय करून पाहा. इन्स्टंट कॉफीमध्ये थोडे गरम पाणी आणि मध घालून ते हलके आणि क्रीमी होईपर्यंत फेटा.
हे मिश्रण थंड दूध आणि बर्फावर घाला. वरून दालचिनी भुरभुरली की व्हिप्ड कॉफी तयार.