IRCTC Alert : ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! PNR अन् UPI डेटा चोरीला जाऊ शकतो, सुरक्षित ऑर्डर कशी कराल?

ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? अनधिकृत ॲप्समुळे PNR, UPI माहिती चोरीला जाण्याचा धोका आहे. सुरक्षित जेवण कसं ऑर्डर कराल? जाणून घ्या IRCTC च्या सूचना.
IRCTC Alert : ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! PNR अन् UPI डेटा चोरीला जाऊ शकतो, सुरक्षित ऑर्डर कशी कराल?
IRCTC Alert : ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! PNR अन् UPI डेटा चोरीला जाऊ शकतो, सुरक्षित ऑर्डर कशी कराल?'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

मुंबई : रेल्वेने प्रवास करताना अनेकजण मोबाईलवरून जेवण ऑर्डर करतात. आवडीचं जेवण थेट आपल्या सीटवर मिळत असल्याने प्रवाशांसाठी ही सुविधा सोयीची ठरते. मात्र, तुम्हीही ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवत असाल, तर सावध व्हा! कारण चुकीच्या वेबसाइट किंवा ॲपवरून जेवण मागवणं तुम्हाला महागात पडू शकतं. तुमचे पैसे तर जाऊ शकतातच, शिवाय पीएनआर क्रमांक, मोबाईल नंबर आणि ऑनलाइन पेमेंटच्या माहितीचा गैरवापरही होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने (IRCTC) प्रवाशांना महत्त्वाचा इशारा दिला आहे.

IRCTC ने प्रवाशांना इशारा का दिला?

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी (७ नोव्हेंबर) आयआरसीटीसीने अनधिकृत वेबसाइट्स आणि मोबाईल ॲप्सवरून जेवण मागवू नये, असं प्रवाशांना सांगितलं. सध्या इंटरनेटवर रेल्वेत जेवण पोहोचवण्याची सुविधा देणाऱ्या अनेक वेबसाइट्स उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी काहींना आयआरसीटीसीची अधिकृत परवानगी नाही.

आयआरसीटीसीने आपल्या अधिकृत एक्स खात्यावर पोस्ट शेअर करत काही अनधिकृत वेबसाइट्सची यादीही प्रसिद्ध केली आहे. कोणत्याही वेबसाइटवरून जेवण मागवण्यापूर्वी ती अधिकृत आहे का, हे तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

जेवण मागवताना कोणते धोके आहेत?

आयआरसीटीसीच्या माहितीनुसार, अनधिकृत वेबसाइट्स अनेकदा परवाना नसलेल्या हॉटेल्समधून जेवण पुरवतात. अशा ठिकाणी अन्न तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळले जात नसण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

याशिवाय ऑनलाइन जेवण मागवताना प्रवासी पीएनआर क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आणि पेमेंटशी संबंधित माहिती देतात. ही माहिती असुरक्षित वेबसाइटवर दिल्यास तिचा गैरवापर होऊ शकतो. फसवणुकीचे मेसेज येणं, वैयक्तिक माहिती चोरीला जाणं किंवा आर्थिक फसवणूक होण्याचा धोका असल्याचं आयआरसीटीसीने स्पष्ट केलं आहे.

काही वेळा पैसे भरल्यानंतरही जेवण मिळत नाही. ऑर्डर रद्द होते किंवा जेवण उशिराने पोहोचतं. अशा वेबसाइट्सवर तक्रार करण्याची योग्य व्यवस्था नसल्यास पैसे परत मिळवणंही कठीण होऊ शकतं.

IRCTC Alert : ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! PNR अन् UPI डेटा चोरीला जाऊ शकतो, सुरक्षित ऑर्डर कशी कराल?
Railway Travel Insurance : काउंटरवरील तिकिटावरही ४५ पैशांत १० लाखांपर्यंतचा विमा; २७ ऑक्टोबरपासून रेल्वेचा नवा नियम

मग ट्रेनमध्ये सुरक्षितपणे जेवण कसं मागवायचं?

प्रवाशांनी जेवण मागवण्यासाठी आयआरसीटीसीच्या अधिकृत ई-कॅटरिंग वेबसाइटचा किंवा 'फूड ऑन ट्रॅक' ॲपचा वापर करावा.

ऑनलाइन जेवण मागवण्यासाठी पुढील पद्धत वापरता येईल.

१. आयआरसीटीसीची अधिकृत ई-कॅटरिंग वेबसाइट किंवा 'फूड ऑन ट्रॅक' ॲप उघडा.

२. त्यामध्ये तुमचा पीएनआर क्रमांक टाका.

३. तुमच्या प्रवासाच्या मार्गावर उपलब्ध असलेली हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ पाहा.

४. आवडीचं जेवण निवडा आणि ते कोणत्या रेल्वे स्थानकावर हवं आहे, हे निश्चित करा.

५. ऑर्डरची माहिती तपासून अधिकृत माध्यमातूनच पेमेंट करा.

याशिवाय १३२३ या आयआरसीटीसीच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करूनही जेवण मागवता येतं. आयआरसीटीसीच्या मान्यताप्राप्त भागीदारांकडूनही ही सुविधा उपलब्ध आहे.

IRCTC Alert : ट्रेनमध्ये ऑनलाइन जेवण मागवताय? सावधान! PNR अन् UPI डेटा चोरीला जाऊ शकतो, सुरक्षित ऑर्डर कशी कराल?
WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करता येणार; ठरलेल्या वेळी आपोआप पाठवला जाणार, जाणून घ्या फीचर कसं काम करणार

अनधिकृत विक्रेत्यांची तक्रार कुठे करायची?

रेल्वेत किंवा रेल्वे स्थानकावर अनधिकृतपणे जेवण विकलं जात असल्याचं आढळल्यास प्रवासी रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) १८२ या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार करू शकतात, असं आयआरसीटीसीने सांगितलं आहे.

दरम्यान, आयआरसीटीसीने ऑनलाइन जेवण मागवण्यावर कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र, प्रवाशांनी अनोळखी वेबसाइट्स, आकर्षक ऑफर्स आणि अनधिकृत ॲप्सपासून सावध राहावं. जेवणाची ऑर्डर देण्यापूर्वी संबंधित सेवा अधिकृत आहे का, याची खात्री करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)